Devendra Fadnavis : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. या प्रकारावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाच्या लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेसे वाटत असतील तर त्यात चुकीच काय, असा सवाल त्यांनी केला.
मराठा आरक्षण आंदोलकांची नजर चुकवत CM शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता
गायकवाड यांनी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले. देवेंद्र फडणवीसांवर निष्ठा असलेल्या व्यक्तीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला असेल. पण, मी पु्न्हा येईन याचा अर्थ असा लावला जाऊ शकतो की शिवसेना-भाजपा आणि अजित पवार गटाचं सरकार राज्यात पुन्हा येईन, असा त्याचा अर्थ आपण समजू.
निवडणुकीनंतर फडणवीसच मुख्यमंत्री होतील या भाजपा नेत्यांच्या दाव्यांवर गायकवाड म्हणाले, आता मी सुद्धा म्हणेन की आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवेत. राष्ट्रवादीवाले म्हणतील की अजित पवार मुख्यमंत्री हवेत. तेव्हा भाजपाच्या लोकांना जर फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाहिजे असतील तर त्याच चुकीचं काय? उद्या मला जर विचारलं तर मी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचच नाव घेईल, असे आमदार गायकवाड म्हणाले.
ट्वीटमध्ये नेमकं काय होतं?
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असं कॅप्शन देत भाजपने एक व्हिडिओ ट्वीट केला होता. मी पुन्हा येईन… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन… गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन… शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…. असं फडणवीस या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत.