Maratha Reservation साठी ठिकठिकाणी रोष; ‘या’ भाजप आमदाराचा ताफा आडवला
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मात्र सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे.
‘या’ भाजप आमदाराचा ताफा आडवला
ठिकठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यांनी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखल अडवले जात आहेत. यामध्ये शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या ताफ्याला घेराव घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. राजळे यांना खरवंडी कासार येथे घेराव घालत मराठा आरक्षणा संदर्भात त्यांची भुमिका जाणून घेतली.
खरवंडी कासार येथे सकल मराठा समाज वतीने मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभुमीवर आमदार राजळे खरवंडी कासार येथे एका दशक्रिया विधीसाठी आल्या असल्याची माहिती मिळताच मराठा समाजातील युवक व महिलांनी आमदार राजळे यांच्या वाहनासमोर उभे राहत घेराव घातला.
भारतीय सकल मराठा तालुकाध्यक्ष अंबादास जगताप यांनी आमदार राजळे यांच्याशी चर्चा केली. आमदार राजळे म्हणाल्या जरांगे पाटलांना माझा पाठींबा आहे. मात्र याचवेळी जगताप यांनी आक्रमक झाले. जगताप म्हणाले गावात दुःखद प्रसंग असल्याने शांत आहे. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी असून गावात येताना पुढील परिणामाची दक्षता घेवूनच पुढाऱ्यांनी खरवंडी कासारमध्ये प्रवेश करावा. आता आमच्या भावनेचा अंत संपला आहे असे मत पत्रकारांशी बोलताना त्यांनी व्यक्त केले.
निवडणुका डोळ्यासमोर मात्र नेत्यांची गोची
राज्यात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने गावोगावचे सर्वच पक्षांतील मराठा समाजाचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. आरक्षणासाठी वेगवेळ्या स्वरूपाची आंदोलने करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी गाव पुढाऱ्यांना तसेच नेतेमंडळी व लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना येण्यास मज्जाव केल्याच्या घटना घडल्या आहे.