Download App

“सांगलीत माझ्याबाबत गैरसमज पसरले पण, आम्ही..” जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

शरद पवारांच्या प्रभावामुळे निवडणुकीत खेळ पालटला आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळलं. सांगली लोकसभेत माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरले गेले.

Jayant Patil on Sangli Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत यंदा सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha Election) मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली होती. उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही विशाल पाटील यांनी (Vishal Patil) बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. नंतर निवडणुकीत ते विजयी झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर (Jayant Patil) टीका केली होती. आता निवडणुकीच्या निकालानंतर स्वतः जयंत पाटील यांनीच या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

विश्वजीत-विशालची सरशी : जयंत पाटलांच्या हातातून सांगली निसटली?

लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Election Result 2024) चांगल्या कामगिरीनंतर जयंत पाटील पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात आले होते. वाळवा तालुका, इस्लामपूर आणि आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांच्या भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जयंत पाटील यांचं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी भाषणात जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) काळात घडलेल्या घडामोडींचा उल्लेख केला.

जयंत पाटील पुढे म्हणाले, शरद पवारांच्या प्रभावामुळे निवडणुकीत खेळ पालटला आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळलं. सांगली लोकसभेत माझ्याबद्दल काही समज गैरसमज पसरले गेले. पण, सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. जर काही वेगळी कृती केली असता शिवसेना आणि काँग्रेस दुखावले गेले असते.

पश्चिम महाराष्ट्रात मविआने युतीला पाणीच पाजलं! सोलापूर, सांगली, अन् कोल्हापुरात दे धक्का..

दरम्यान, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी दबाव झुगारुन बंडखोरीचा निर्णय लोकसभा निवडणुकीत घेतला होता. विशाल पाटलांना कदमांनी छुपी रसद पुरवली. जयंत पाटलांच्या कथित कुरघोड्यांना काँग्रेस आणि विशाल पाटील पुरुन उरले. सांगलीची जागा, विशाल पाटील राज्यात गाजले. आता विशाल पाटील विजयी झाल्याने विश्वजीत कदमांचे यशस्वी नेतृत्व पुढे आले आहे.

आता सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा खासदार, काँग्रेसचे दोन आमदार, विश्वजीत कदमांचे नेतृत्व अशा सगळ्या गोष्टी एकत्र घडून आल्या आहेत. त्यामुळेच आगामी काळात जिल्ह्याचे नेतृत्व कोणता नेता करणार? विश्वजीत कदमांचे सरशीने जयंत पाटलांच्या हातातून सांगली जिल्हा निसटला आहे का? असे प्रश्न विचारले जात आहेत. या कळीच्या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळतीलच.

follow us