Vishal Patil यांच्यासाठी काँग्रेसचे ‘लिफाफ्यातून’ गिफ्ट तयार… मेळाव्यातून दिली छुपी ताकद

Vishal Patil यांच्यासाठी काँग्रेसचे ‘लिफाफ्यातून’ गिफ्ट तयार… मेळाव्यातून दिली छुपी ताकद

सांगलीच्या जागेचा घोळ मिटल्यानंतर इथे एक प्रश्न अनुत्तरित राहिला. हा प्रश्न म्हणजे आघाडी धर्म म्हणून काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मदत करणार का? की बंडखोर विशाल पाटील यांच्या मागे छुपी ताकद उभी करणार?

याच प्रश्नाचा उहापोह करण्यासाठी आज सांगलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत एक मेळावा पार पडला. खरंतर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या तिन्ही नेत्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र येणे यावरुन सांगलीत कार्यकर्त्यांच्या नाराजीची तीव्रता किती असावी याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. शिवाय मतदानाला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिले असतानाच काँग्रेसचा एकही कार्यकर्ता अद्याप चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराकडे फिरकलेला नाही. जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या मदतीने त्यांची एकट्याचीच वणवण सुरु आहे. यावरुन काँग्रेसच्या या मेळाव्याचे महत्व काय असावे हेही ठरवता येते. (in Sangli in the presence of Congress state president Nana Patole, group leader Balasaheb Thorat and former chief minister Prithviraj Chavan.)

पण मेळाव्यात काय घडले हाही एक चर्चेचा विषय आहे. खरंतर मेळाव्याचा उघड उद्देश हाच मूळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे, त्यांना आघाडी धर्माची आठवण करुन देऊन चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरवणं हा होता. याच मेळाव्यात विशाल पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची भाषा केली जाईल अशी अपेक्षा या मेळाव्यावर डोळे लावून बसलेल्या ठाकरे, राऊतांसह शिवसैनिकांना होती. पण या मेळाव्याचा छुपा उद्देश होता तो कार्यकर्त्यांची चंद्रहार पाटील यांना मदत करण्याची भावना नाही हे पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणं, पक्षश्रेष्ठींबद्दल तयार झालेले गैरसमजाचे मोहोळ दूर करुन डॅमेज कंट्रोल करणे आणि बंडखोर विशाल पाटलांसाठी भावनिक वातावरण तयार करणे. हाच उद्देश अनेक अर्थांनी आजच्या मेळाव्यातून सार्थ झाल्याचे पाहायला मिळाले.

सांगलीत बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर कारवाई होणार? नाना पटोले म्हणाले…

विश्वजीत कदम यांनी मेळाव्याचे आयोजन केले. पदाधिकारी, कार्यकर्ते यांची गर्दी जमवली. प्रत्येक तालुक्यातील प्रमुखांना भाषण करण्याची संधी दिली. या भाषणातून शेवटी प्रत्येक जण पटोले, थोरात आणि चव्हाण यांच्याकडे पाहुन “तुम्ही जे सांगाल ते आम्ही करु, निकालावेळी चांगले गिफ्ट देऊ” असा छुपा संदेश देत होते. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, विशाल पाटील यांचे चिन्ह लिफाफा आहे आणि ते गिफ्ट देण्यासाठी वापरतात. कार्यकर्ते विश्वजीत कदम यांच्या नावाच्या घोषणा देत होते. “विश्वजीत कदम तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” चा नारा देत होते. काँग्रेसचा पंजा कसा गायब झाला याचं उत्तर मिळालचं पाहिले अशी आक्रमक विधाने करत होते. खाली बसलेल्या श्रोत्यांमध्ये जयंत पाटील यांनी केलेल्या कथित राजकारणाबद्दलही राग होता.

पदाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या भावनिक वातावरणात विश्वजीत कदमांनी भाषण सुरु केले. त्यांनी सांगली जिल्ह्यातील आतापर्यतच्या काँग्रेसच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. आपण सांगलीची जागा मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कार्यकर्त्यांना सांगितलं. जे की सगळ्यांना माहिती होते. कदम यांनी त्यांच्या भाषणात ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. जागा काँग्रेसची आहे, हे माहिती असतानाही ते इथे येतात, उमेदवारीची घोषणा करतात हे असं होतं का? असा सवाल नेत्यांना विचारला. चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळीही काहीतरी चुकीचे घडत आहे, हे आपण सांगत असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तरीही श्रेष्ठी गप्प का होते, कोण-काय करत होते, याकडे लक्ष का दिले नाही? असा सवालही विचारला.

…मग त्या 10 वर्षांत शरद पवारांनी काय केलं? मुख्यमंत्री शिंदेंची टीका

आमच्या तोंडचा घास हिस्कावला आहे, असं म्हणत कदम यांनी भाषणात अप्रत्यक्षपणे झालेल्या राजकारणाचाही उल्लेख केला. “आम्ही जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी संपवली. काँग्रेस एकसंध ठेवली, वाढवली पण काहींची दृष्ट लागली. आता ती दृष्ट काढण्याची ताकद आमच्यात आहे. मी पतंगराव कदम यांचा मुलगा आहे. त्यांचे काही गुण माझ्यात आहेत. पण माझ्यात स्वतःचेही काही गुण आहेत, सांगलीत कारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही”, असे म्हणत अप्रत्यक्षपणे इस्लामपूरच्या दिशेने इशाराही दिला. थोडक्यात श्रेष्ठींसमोरच कदम यांनी विशाल पाटील यांच्यासाठी मैदान मोकळे करुन दिले. त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही कथित राजकारणाचा उल्लेख केला.

पृथ्वीराज चव्हाण यांनी तर “या जागेबाबत खूप मोठे राजकारण झाले, ते हळू हळू तुमच्यासमोर येईल” हे मान्य केले. त्यानंतर पटोले भाषणाला उभे राहिले. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच विश्वजीत कदम यांच्या नावाच्या घोषणा सुरु झाल्या. त्यावर पटोले म्हणाले की “मी सुद्धा विश्वजीत दादांसोबत आहेत. त्यांच्या विचारांना माझे समर्थन आहे.” पटोलेंचे हे वाक्य ऐकताच कदमांची कळी खुलली. सबंध बैठकीदरम्यान, ते पहिल्यांदाच हसताना दिले. नाना पटोले यांनीही मी तुम्हाला इशाऱ्या इशाऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगेन असे सांगितले. त्या त्यांनी सांगितल्या देखील. थोरात, चव्हाण आणि पटोले यांनी शेवटी मशाल चिन्हाला विजयी करा असे म्हटले. पण विशाल पाटील यांच्या बंडखोरीबाबत एकाही नेत्याने एकही चकार शब्द काढला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना जो छुपा संदेश मिळायचा होता तो मिळाला होता.

थोडक्यात आजचा मेळावा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि चंद्रहार पाटील यांना मदत करा असा उघड संदेश देण्यासाठी असला तरी कार्यकर्त्यांना विशाल पाटील यांनाच छुपी मदत करा, असा संदेश देण्यासाठी होता असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. काँग्रेसच्या मेळाव्याचे टायमिंगही कमालीची होते. पहिल्या दोन टप्प्यातील प्रचार थांबल्यानंतर काँग्रेसच्या 17 पैकी आठ ते दहा जागांवरील मतदान पार पडत आहे. याठिकाणी लागणारी शिवसेनेची मदत त्यांना मिळाली आहे. आता मुंबईतील मतदान अद्याप दूर आहेत. तोपर्यंत सांगलीतील मतदान पार पडत आहे. त्यामुळे आता विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसची छुपी ताकद राबू शकते अशीच शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube