Sangli Lok Sabha Election : सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीतील तिढा अजूनही (Sangli Lok Sabha Election) सुटलेला नाही. आता तर विशाल पाटील यांनी (Vishal Patil) आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. विशाल पाटील यांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यासह ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विशाल पाटील यांनी मतदारसंघातील तिढ्यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.
सांगली मतदारसंघ राज्यात चर्चेत राहिला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी मला बोलावलं होतं. यावेळी सांगलीतील स्थानिक नेतेही उपस्थित होते. या व्यतिरिक्त राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याबरोबरही चर्चा झाली आहे. सांगलीत जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यातून लवकरात लवकर संयु्क्तिक मार्ग काढावा अशी मागणी केली आहे, असे विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Congress Candidate List : जालन्यातून डॉ. कल्याण काळे, तर धुळ्यातून शोभा बच्छाव रिंगणात
विशाल पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यातील एक अर्ज अपक्ष म्हणून भरला आहे. तर एक अर्ज काँग्रेसकडून भरला जाणार आहे. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आता पुढील जबाबदारी पक्षाच्या राज्य आणि दिल्लीतील नेतृत्वाची आहे. महाविकास आघाडी अबाधित राहिली पाहिजे. यासाठी आगामी काळात काय पावलं टाकली पाहिजेत हे राज्यातील आणि दिल्लीतील नेतृत्वानं ठरवावं, असे कदम म्हणाले.
या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार देण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. महाविकास आघाडीकडून चूक झाली. आता केलेली ही बंडखोरी नाही. जर 22 तारखेपर्यंत अर्ज कायम राहिला तरच बंडखोरी म्हणता येईल. 19 एप्रिल रोजी जर पक्षाने उमेदवारी दिलीच नाही तर पुढे काय तो निर्णय घेऊ. सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाकडून निश्चितच उमेदवारी जाहीर होईल असे विशाल पाटील म्हणाले.
विशाल पाटील यांनी आज दुपारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडी अबाधित राहणे गरजेचे आहे. जर ठाकरे गटाने या मतदारसंघात आपला उमेदवार कायम ठेवला तर विशाल पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सांगलीत नवा डाव! महाविकास आघाडीला धक्का देत विशाल पाटील भरणार अपक्ष अर्ज
विशाल पाटील यांच्याकडे अजून पक्षाचा एबी फॉर्म नाही. सांगलीची जागा आमचीच होती. हा आमचाा परंपरागत मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी अशी अपेक्षा असणं सहाजिक आहे. परंतु, ज्यावेळी आघाडीत पुढे जाण्याचा विषय येतो तेव्हा काही फायदे तोटेही स्वीकारायचे असतात असे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट सांगितले.