सांगलीत नवा डाव! महाविकास आघाडीला धक्का देत विशाल पाटील भरणार अपक्ष अर्ज…

सांगलीत नवा डाव! महाविकास आघाडीला धक्का देत विशाल पाटील भरणार अपक्ष अर्ज…

Sangli Lok Sabha Election : सांगली मतदारसंघात महाविकास आघाडीला अखेर ज्याची भीती होती तेच घडलं आहे. अतोनात प्रयत्न केल्यानंतरही मतदारसंघ ठाकरेंकडून सोडवून घेता आला नाही. त्यामुळे अखेर या मतदारसंघात बंडखोरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशाल पाटील यांच्या पीएने उमेदवारी अर्ज घेतला आहे. विशाल पाटील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून उमेदवारीसाठी ते अजूनही आग्रही आहेत. दरम्यान, विशाल पाटील यांनी जर हा निर्णय कायम ठेवला तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. ठाकरे गटाच्याही अडचणी वाढणार आहेत.

विश्वजीत कदम अन् विशाल पाटलांना टोकाचा निर्णय घ्यावाचं लागणार; सांगलीसाठी ठाम का? राऊतांनी सांगितलं कारण…

महाविकास आघाडीत सांगली मतदारसंघ चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाने काँग्रेसकडून अक्षरशः हिसकावून घेतला. उमेदवारही जाहीर केला. ठाकरे गटाची ही चाल काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांनीही मतदारसंघ मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. थेट दिल्ली गाठली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. परंतु, या कशाचाच उपयोग झाला नाही.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा अंंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडेच राहिल यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतरही काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, विशाल पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, तरीही सांगली ठाकरे गटाकडेच राहिले हे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर विशाल पाटील यांनी पुढील हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसने सांगलीत उमेदवार दिला नाही तर विशाल पाटलांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत. विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने त्यांच्यासाठी अर्ज घेतल्याने मतदारसंघात बंडखोरी निश्चित दिसत आहे.

नाराजीची धग सांगली मार्गे मुंबई; जागावाटपात काँग्रेसच्या कठोर भूमिकेची गरज होती : वर्षा गायकवाड

वसंतदादा आघाडी या नावाने नव्या आघाडीची स्थापना केली जाणार आहे. त्यांच्या नावाने उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विशाल पाटील आजच अर्ज भरणार होते. परंतु, तांत्रिक कारणांमुळे शक्य झालं नाही. आता ते सोमवारी अर्ज दाखल करतील असे सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज