Lok Sabha Opposition Leader : दहा वर्षानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला (Lok Sabha Opposition Leader) आहे. काँग्रसने ही जबाबदारी खासदार राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) दिली आहे. राहुल यांच्याआधी त्यांच्या आई सोनिया गांधी आणि वडील राजीव गांधी यांनी देखील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली आहे. 1989 ते 1991 या काळात राजीव गांधी आणि 1999 ते 2004 या काळात सोनिया गांधी (Sonia Gandhi) विरोधी पक्षनेत्या होत्या.
विरोधी पक्षनेता हे लोकसभेतील एक संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या पक्षाकडे हे पद दिले जाते. आताच्या लोकसभेत काँग्रेस (९९ खासदार) सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी संबंधित पक्षाकडे लोकसभेतील एकूण जागांपैकी १० टक्के जागा असणे बंधनकारक आहे.
साधारणपणे लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला पंतप्रधानपदाचा दावेदार मानले जाते. परंतु भारताच्या इतिहासात आतापर्यंत १४ पैकी १२ विरोधी पक्षनेत्यांना काही पंतप्रधान होता आलं नाही. इतकेच नाही तर यातील दोन विरोधी पक्षनेत्यांच तर राजकारणच संपुष्टात आलं. सन १९७७ मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा जनता पार्टीचे सरकार बनले त्यावेळी या पदाला परिभाषित केले होते. त्यावेळी या पदावरील व्यक्तीकडे अनेक अधिकार देण्यात आले होते.
उपाध्यक्षपदासाठीही NDA चा मोठा गेम; ‘या’ पक्षाला संधी देत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम?
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेच लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात. याव्यतिरिक्त अनेक पदांवर होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये विरोधी पक्षनेता महत्वाची भूमिका बजावतो. लोकसभेतही विरोधी पक्षांचा आक्रमक आवाज म्हणून विरोधी पक्षनेत्याकडं पाहिलं जातं. देशात सर्वात आधी १९६९ मध्ये विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची मिळाली होती. काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरीच याला कारणीभूत ठरली होती. पक्षातील जुन्या नेत्यांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. या बंडखोरांचं नेतृत्व कामराज करत होते. या गटाचं नाव काँग्रेस (ऑर्गनायझेशन) ठेवण्यात आलं.
ज्यावेळी पक्षात दोन गट पडले तेव्हा सरकारला काँग्रेस (ओ) ला विरोधी पक्षाची मान्यता द्यावी लागली. बिहार राज्यातील (Bihar Politics) बक्सर मतदारसंघातील खासदार राम सुभाग सिंह विरोधी पक्षनेते बनले. तेव्हापासून आतापर्यंत लोकसभेत 14 विरोधी पक्षनेते झाले आहेत. यामध्ये लालकृष्ण अडवाणी तीन वेळा, अटल बिहारी वाजपेयी आणि यशवंतराव चव्हाण यांना दोन-दोन वेळा विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मिळाली.
विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी वगळता अन्य कोणत्याच विरोधी पक्षनेत्याला पंतप्रधान पदाची खुर्ची मिळालेली नाही. सन १९९६ मध्ये अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते होते. त्यांनाच फक्त पंतप्रधान होता आले. सन १९७९ मध्ये जगजीवन राम, २००४ मध्ये सोनिया गांधी आणि २००९ मध्ये लालकृष्ण अडवाणी पंतप्रधानपदाचे दावेदार मात्र होते.
पेपरलीक, तिसरी अर्थव्यवस्था, जम्मू काश्मीर अन् विरोधकांची घोषणाबाजी.. राष्ट्रपतींच्या भाषणात काय?
या व्यतिरिक्त विरोधी पक्षनेते राहिलेले शरद पवार, सुषमा स्वराज, यशवंतराव चव्हाण यांचीही नावं पंतप्रधान पदासाठी (Sharad Pawar) घेतली जात होती. १९९६ मध्ये पंतप्रधान पदापासून बाजूला झाल्यानंतर पीव्ही नरसिंहराव विरोधी पक्षनेते बनले होते. परंतु या पदावर ते फक्त पंधरा दिवस राहिले होते. यानंतर मात्र नरसिंह राव राष्ट्रीय राजकारणातून दुर्लक्षित झाले.
दोन विरोधी पक्षनेते असे राहिले आहेत ज्यांनी हे पद सोडल्यानंतर त्यांचं राजकीय करिअरच संपलं. यामध्ये पहिलं नाव राम सूभाग सिंह यांचं आहे. १९६९ ते ७१ या काळात विरोधी पक्षनेते राहिलेले राम सुभाग सिंह यानंतर कोणत्याही मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. १९७१ मध्ये तर लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनंत शर्मा यांनी ३० हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला होता.
जगजीवन राम यांच्या बाबतीतही असेच घडले होते. विरोधी पक्षनेतेपद सोडल्यानंतर त्यांना सुद्धा दुसरे कोणतेही मोठे पद मिळाले नाही. १९८० च्या दशकात जगजीवन राम पंतप्रधान पदाचे सर्वात प्रबळ दावेदार होते. पीव्ही नरसिंहराव सुद्धा पंतप्रधान पदानंतर विरोधी पक्षनेते बनले होते. परंतु त्यांचा हा कार्यकाळ फक्त पंधरा दिवसांचा राहिला. विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतर राव राजकारणात दुर्लक्षित होत गेले. सन २००४ मध्ये त्यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली होती परंतु नंतर माघार घेतली.
विरोधी पक्षनेते पदावर उत्तर भारतीय राजकारण्यांचाच दबदबा राहिला आहे. राहुल गांधी यांच्यासह आतापर्यंत १५ विरोधी पक्षनेते झाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातून पाच, महाराष्ट्रातून ३ गुजरात आणि बिहारमधून प्रत्येकी दोन तर दक्षिण भारतातील दोन नेत्यांकडे हे पद राहिले आहे. केरळमधील इडुक्की मतदारसंघातील खासदार सीएम स्टीफन १९७८ ते १९७९ या काळात १ वर्ष ८८ दिवस विरोधी पक्षनेते पदावर राहिले. तर १९९६ मध्ये पीव्ही नरसिंहराव पंधरा दिवसांसाठी या पदावर होते. या दोन्ही नेत्यांचा विरोधी पक्षनेते पदाचा एकूण कार्यकाळ ४६८ दिवसांचा राहिला.