Download App

काँग्रेसची आंबेडकरांना साद! थेट दिल्लीतून मोठ्या नेत्याचा फोन; नव्या आघाडीची तयारी?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता तर आहेच पण अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदे गटासह भाजपाच्याही काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

काँग्रेसने (Congress) तर आणखी आघाडी घेत राज्यात नवे मित्र शोधण्याची मोहिम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना साद घातली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी काल जवळपास 13 मिनिटे दूरध्वनीद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा केली. संभाव्य आघाडी कशी असू शकते? आणि पुढील वाटचाल कशी राहिल? या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे.

अजित पवार सत्तेत; गोगावले म्हणाले, ‘नाराज होऊन काय करता? मंत्रिमंडळ विस्तारात माझा नंबर…’

तसे पाहिले तर याआधी 1998 मध्ये प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. प्रकाश आंबेडकर स्वतः दोन वेळेस काँग्रेसच्या मदतीने अकोला मतदारसंघातून विजयी झाले होते. तसेच त्यांचे आमदारही निवडून आले होते. काँग्रेसबरोबर आघाडीचा राजकीय फायदा होऊ शकतो त्यामुळे प्रकाश आंबेडकर आघाडीचा निर्णय घेऊ शकतात, अशीही शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

याच अनुषंगाने काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर प्रत्यक्षात आघाडीची चर्चा होईल,अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. यानंतर मात्र काही घडले नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घ्यायचे की नाही यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे या युतीचे पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

कर्नाटकातही एक अजित पवार, वर्षाअखेरीस चित्र बदलणार? एच. डी. कुमारस्वामींच्या दाव्याने खळबळ…

यानंतर काही दिवसात राष्ट्रवादीतच अजित पवार यांनी मोठा भूकंप घडवून आणला. या भूकंपामुळे राज्याच्या राजकारणाचे गणितेच बदलून गेली आहेत. निर्णय घेण्यात नेहमीच वेळकाढूपणा करणाऱ्या काँग्रेसने दोनच दिवसात हालचाली करत आघाडीत नवीन मित्र शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यातील चर्चा महत्वाची मानली जात आहे.

Tags

follow us