Rohit Pawar : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचीही युवा संघर्ष यात्रा जोरात सुरू आहे. बुधवारी ही यात्रा वर्धा जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही हल्लाबोल केला.
पद सोडा नाहीतर चर्चा तरी करा
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष दिसून येत आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर रोहित पवार यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली. छगन भुजबळ सत्तेत आहेत. त्यांच्याकडे संविधानिक पद आहे. तुमच्याकडे पद असेल तर त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी केला पाहिजे. कॅबिनेट बैठकीत बोललं पाहिजे. बाहेर जाऊन प्रसारमाध्यमांसमोर मोठ मोठी भाषणं करण्यापेक्षा संविधानिक पद सोडा नाहीतर कॅबिनेटमध्ये चर्चा तरी करा असे आव्हान रोहित पवारांना मंत्री भुजबळ यांना दिले.
त्यांना कुटुंब अन् पक्ष फोडण्याची सुपारी
सत्तेत बसलेल्या लोकांनी कुटुंब आणि पक्ष फोडण्याची सुपारी घेतली आहे. राज्यातले सगळे प्रकल्प गुजरातला नेले जावेत, तिथल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठीही सरकारच्या सर्वच नेत्यांनी सुपारी घेतली आहे. राज्यातील जनता अडचणीत असताना फक्त स्वतःचं हित जपायची, स्वतःच्या पदाचीच चर्चा करण्याची सुपारी या मंडळींनी घेतल्याची टीका रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. यावरही आमदार पवार यांनी भाष्य केले. राज्यातील सर्वसामान्य जनता अडचणीत असताना त्यावर चर्चा करण्याऐवजी सरकाने कसिनोचे बिल आणले आहे. यावरुच दिसत आहे की सरकार गोंधळलेलं आहे आणि निकामी आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.