Download App

Sharad Pawar’s birthday: शरद पवारांची सुरूवातच भावाचा पराभव करून झाली… तेथे पुतण्याचे काय?

  • Written By: Last Updated:

(Sharad Pawar's birthday) कुटुंब का पक्ष, यासाठी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही,` हे वाक्य दुसरे-तिसरे कोणाचे नसून ते आहे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे. वयाची ८३ वर्षे पूर्ण करणाऱ्या पवारांसाठी हे वाक्य त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी देखील महत्वाचे होते. आजही हेच वाक्य त्यांच्या मनात पक्के घर करून बसले आहे.

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे राजकारण आणि त्यांचे कौटुंबिक पण संबंध याचा धावता आढावा यात घेणार आहोत. पवार यांनी कुटुंबापेक्षा पक्ष नेहमी महत्वाचा मानला. त्याची प्रचिती आली ती १९६० मध्ये. म्हणजेच पवारांच्या वयाच्या विसाव्या वर्षी. त्या वेळी त्यांनी खुद्द थोरले बंधू वसंतराव यांच्या विरोधात प्रचार करून आपल्या राजकाराणाचा श्रीगणेशा बारामतीत केला होता. आता त्याच पवारांना वयाच्या  ८४ व्या वर्षीही आपल्या पुतण्याच्या विरोधात म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात संघर्ष करावा लागत आहे. त्याला पवार डगमगलेले नाहीत. कौटुंबिक संबंध वेगळे आणि राजकारण वेगळे असे मानणारे पवार या लढाईसाठी पूर्ण तयारीने उतरले आहेत.
‘अजित पवार गटाचा चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न’; शरद पवार गटाचा आरोप

 

सख्ख्या भावाच्या विरोधात भूमिका

त्यांची कुटुंबातील पहिली राजकीय लढाई कशी झाली, याचा थोडक्यात आढावा आपण घेऊ. पवार हे पुण्यात शिकत असताना पुणे शहर युवक काॅंग्रेसचे चिटणीस झाले. पक्षावरील त्यांच्या निष्ठेची कसोटी पाहणारा प्रसंग लगेचच त्यांच्या जीवनात आला. बारामतीचे तत्कालीन खासदार आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते केशवराव जेधे यांचे १९६० मध्ये निधन झाले. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे महाराष्ट्रात वारे होते. कारण १९५७ च्या निवडणुकीत समितीने काॅंग्रेसच्या विरोधात घवघवीत यश मिळवले होते. अशातच पोटनिवडणूक झाली.

पवार यांच्या मातोश्रीसह सर्व कुटुंब हे महाराष्ट्र संयुक्त समितीचे काम पाहत होते. समितीने बारामती लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पवार यांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव यांना उमेदवारी दिली. इकडे पवार तर काॅंग्रेसचे पदाधिकारी होते. पण आपण सख्ख्या भावाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली नव्हती. या निवडणुकीत वसंतराव पवार यांचा पराभव झाला आणि काॅंग्रेसचे उमेदवार गुलाबराव जेधे हे विजयी झाले. स्वतःच्या भावाच्या विरोधात प्रचार करताना शरद पवारांची वयाच्या विसाव्या वर्षी कोंडी झाली नव्हती. त्यामुळे अजितदादांच्या विरोधात पक्ष म्हणून लढताना पवार हे पुन्हा नव्या ऊर्जेने उतरलेले दिसतात.

एका परीनं सख्ख्या मोठ्या भावाच्या विरोधात उभे राहिलेले शरद पवार हे तेव्हाही विचाराने पक्के होते आणि आजही तसेच आहेत.

पवार यांचे नातेवाईक आणि स्नेही पद्मसिंह पाटील व त्यांचा मुलगा राणा जगजीतसिंह हे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसमधून भाजपमध्ये गेले. तेव्हा तुमचे नातेवाईक भाजपमध्ये चालले, याचे वाईट वाटत नाही का, असा सवाल पत्रकारांनी पवार यांना विचारला होता. या प्रश्नावर पवार चिडले होते. कुटुंब आणि राजकारणाचा काय संबंध? तुम्हा असा प्रश्न कसा विचारू शकता? असे उलटे प्रश्न पवारांनी पत्रकारांना विचारले होते.

पवार यांच्या सख्ख्या बहिणीचे पती आणि ज्येष्ठ समाजवादी नेते एन. डी. पाटील हे आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षासोबत राहिले. त्यांनी पवारांच्या विरोधात प्रचार केला. वेळ प्रसंगी टीका केली. एनराॅन वीज प्रकल्पावरून तर त्यांनी पवारांना धारेवर धरले होते.
‘पवारांचा नातू असूनही मंत्री नव्हतो आमदारच होतो’; रोहितदादांचा रोख कुणाकडे?

त्यामुळे भाऊ, मेव्हणे आणि इतर नातेवाईक यांच्याशी राजकीय संघर्ष पवारांना नवा नाही. आता यात पुतण्याची भर पडली आहे. तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत एकच फरक आहे. तो म्हणजे पवार यांचे सर्वस्व म्हणजे पक्षच पुतण्याने ताब्यात घेतला आहे.  त्यामुळे पवारांसाठी हा काळ मोठा कठीण आला आहे. बहुतांश आमदार, खासदार हे अजितदादांसोबत आहेत. पवारांसोबत नेते नाहीत पण कार्यकर्ते आहेत, असा दावा होत आहे. पण त्याची खातरजमा प्रत्यक्षात झालेली नाही. आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात अजितदादांचे आव्हान पवारांसाठी सर्वात मोठे आहे.  पुतण्याने काकांनी आपल्याला राजकीयदृष्ट्या अंधारात ठेवल्याचा म्हणजेच फसविल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे भाजपसोबत जायचे ठरलेले असताना पवारांनी मला ऐनवेळी तोंडघशी पाडले, असा अजितदादांचा सूर आहे. पवार मात्र हे सारे फेटाळत आहेत. जनता अशा लोकांना जागा दाखवेल, अशी आशा बाळगून ते नव्या दमाने रिंगणात उतरले आहेत. आता या संघर्षात फक्त पवारांच्या वयाचे आकडे बदलले आहेत. अजितदादांनाही आपल्या काकांची ताकद माहिती आहे. काकांचा विरोध असतानाही ते भाजपसोबत गेले. जाताना सारा पक्ष घेऊन गेले, ही बाब पवार सहजासहजी अजितदादांच्या पचनी पडू देणार नाहीत. या लढाईत मुलगी सुप्रिया सुळे आणि दुसरा नातू रोहित पवार हे पवार यांच्यासोबत आहेत.

पवारांसाठी संघर्ष नवा नाही. त्यांना शारीरिकदृष्ट्या खचविणारा कॅन्सरचा आजार झाला. त्याला ते पुरून उरले. खुबा मोडला तरी ते ताठ उभे राहिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतच पक्षाला घरघर लागली होती. तरी त्यांनी सत्ता खेचून आणली. आता पक्ष पुतण्याने फोडला तरी त्यावर मात करण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. पुतण्या असला म्हणून काय झाले, राजकीय लढाईत पवार हे कोणालाच दयामाया दाखवत नाहीत. वाघाचे वय झाले असले तरी चाल कायम आहे. त्याचीच धास्ती त्यांच्या विरोधकांना असते. म्हणूनच पवार हे कसलेल्या मल्लाारखे असतात. मातीला पाठ लागेल असे वाटत असतानाच ते पुन्हा उसळी घेतात. त्यातूनच मग ते समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी पुन्हा जोर लावतात. समोर भाऊ असो की पुतण्या, त्याने त्यांना फरत पडत नाही. पवार हे ज्येष्ठ भावासमोर नमले नाहीत, हे अजितदादांना माहिती आहेच. त्यामुळेच पवारांची धास्ती अजूनही त्यांना वाटते.

तर अशा संघर्षशील नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

follow us