कोल्हापूरकरांसाठी आजच्या घडीला सगळ्यात ‘अनप्रेडिक्टेबल’ मतदारसंघ कोणता असेल तर तो ‘कोल्हापूर उत्तर’. शहरातील दक्षिण, करवीर या दोन मतदारसंघांमधील महायुती आणि महाविकास आघाडीची समीकरणे जवळपास निश्चित आहेत. यावरचे व्हिडीओही लेट्सअप मराठीने यापूर्वी केले आहेत. त्याची लिंक इथे दिलीच आहे. पण कोल्हापूर उत्तर (Kolhapur North assembly constituency) मतदारसंघ कोणाला जाणार इथं पासून उमेदवार कोण असणार आणि विजयी कोण होऊ शकते यापैकी कोणताच अंदाज कोल्हापूरच्या जनतेला लावता येईना झालाय. सगळेच पक्ष इच्छुक आहेत, उमेदवारांची रेलचेल आहे. शक्ति प्रदर्शन, बॅनर्स आणि विजयांच्या दाव्यांच्या पैजा यामुळे शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ इथले वातावरण ढवळून निघत आहे. (Who will be the candidate from Mahayuti and Mahavikas Aghadi in Kolhapur North assembly constituency)
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ म्हणजे एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला होता. दिवंगत नेते एन.डी. पाटील हे एकदाच विधानसभेचे सदस्य झाले, ते याच मतदारसंघातून. पण काळाच्या ओघात शिवसेनेने इथे आपला भगवा फडकवला. 1990 मध्ये दिलीप देसाई आणि 1995, 1999 मध्ये सुरेश साळोखे हे इथून आमदार झाले. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला ठोस उत्तर सापडले ते 2004 मध्ये. एका रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये येत धाकटे युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी तिकीट मिळवले आणि ते आमदार झाले.
2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली. यात शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजेंचा पराभव केला. चुरशीच्या निवडणुकीत क्षीरसागर अवघ्या 3700 मतांनी आमदार झाले. शिवसेनेने मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला. पराभवानंतर मालोजीराजे अज्ञातवासातच गेले. 2014 मध्ये ते इच्छुक नव्हते. त्यामुळे काँग्रेसने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली. पण शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीच्या जोरावर क्षीरसागर सहजपणे आमदार झाले. त्या निवडणुकीत करवीरमध्ये पी.एन. पाटील आणि दक्षिणेत सतेज पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला होता.
2019 च्या निवडणुकीपूर्वी मालोजीराजे छत्रपती पुन्हा सक्रिय झाले होते. पण सतेज पाटील यांनी चंद्रकांत जाधव यांच्या उमेदवारीसाठी ताकद लावली. साधा-सरळ माणूस, स्वच्छ प्रतिमा आणि विरोधी उमेदवाराबद्दल तयार झालेले नकारात्मक वातावरण यामुळे अवघ्या 15 दिवसात चंद्रकांत जाधव आमदार झाले. त्यांनी खेळातून तयार केलेले नेटवर्क, सामाजिक कार्यामुळे झालेले नाव आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेले त्यांचे जवळचे संबंध या गोष्टी त्यांना उपयोगी पडल्या. असं म्हणतात की क्षीरसागर यांना पराभूत करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनीच फिल्डिंग लावली होती. पण जाधव पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले होते हेही तितकचं खरं.
दुर्दैवाने चंद्रकांत जाधव यांचे नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर पत्नी जयश्री जाधव आमदार झाल्या. पण त्यांची आमदार होण्याची लढाई सोपी आजिबात नव्हती. राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेकडून दावा सांगितला होता. त्यामुळे बंडखोरीची किंवा दगाफटक्याची भीती होती. परंतु शिवसेनेने आघाडी धर्म पाळला. क्षीरसागर शांत राहिले. भाजपने सत्यजीत कदम यांना काँग्रेसमधून आयात करुन उमेदवारी दिली. चंद्रकांत पाटील, महाडिक गटाची ताकद त्यांच्यासोबत होती. पण चंद्रकांत जाधव यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट आणि महाविकास आघाडीची एकत्रित ताकद लागली. जयश्री जाधव 19 हजार मतांनी आमदार झाल्या.
आज घडीला आमदार म्हणून जयश्री जाधव लोकसंपर्कात आहेत. विकास कामांचाही पाठपुरावा करतात. लोकसभा निवडणुकीतही शाहू छत्रपती यांना 13 हजार 800 इतके मताधिक्य आहे. पण विधानसभा निवडणुकीत केवळ याच गोष्टींचा विचार करुन चालणार नाही. लोकसभेला ज्या प्रकारच्या जोडण्या लागल्या आणि आर्थिक ताकद वापरली गेली हे पाहता विधानसभा कैकपट पुढे जाईल हे नक्की आहे. त्यामुळे त्या पातळीवर लढताना आमदार जाधव यांच्यावर मर्यादा येऊ शकतात.
माजी आमदार मालोजीराजे किंवा मधुरिमाराजे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र पुन्हा छत्रपती घराण्यातच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता धूसर आहे. मालोजीराजे यांनीही त्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. पण स्थानिक पत्रकारांच्या मते, त्यांचे राजकारण महापालिकेपुरते आहे. त्यांना शहरात अजून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसचा अंतिम पर्याय सापडलेला नाही. कोणीच नसल्यास जयश्री जाधव याच पुन्हा उमेदवार होऊ शकतात.
महाविकास आघाडीत उत्तर मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला सोडावा अशी आग्रही मागणी आहे. पोटनिवडणुकीत शिवसेना काँग्रेससोबत होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षे शिवसेनेकडे होता. यापूर्वीचे खासदारही शिवसेनेचेच होते. परंतु छत्रपती शाहू महाराजांसाठी जागा काँग्रेसला सोडली. शिवसैनिकांनीही छत्रपतींच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. थोडक्यात दोन्ही निवडणुकीत आघाडी धर्म पाळला आहे. शिवाय 1990 पासून पाच वेळा शिवसेनेचा तर दोनवेळाच काँग्रेसचा विजय झाला आहे. असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने हक्क सांगितला आहे. ठाकरेंकडून जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मतदारसंघाचे संपर्कप्रमुख रघुनाथ खडके यांची नावे चर्चेत आहेत.
महायुतीमध्येही या मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन वर्षांपासूनच तयारी सुरु ठेवली आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, संपर्क दौरे सातत्याने सुरु आहेत. महायुतीच्या अडीच वर्षांच्या काळात आपण 200 कोटींपेक्षा जास्त निधी आणल्याा दावा ते करत आहेत. त्यामुळे काही झाले तरी ही जागा शिवसेना भाजपसाठी जागा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेने भाजपचा पराभव केला होता, पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला आहे, अशी गणिते शिवसेनेकडून मांडली जात आहेत.
पण, पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरीही इथे 78 हजार मते घेतली होती. आता भाजपची ताकद वाढली आहे. शहरात हिंदुत्ववादी मतांचे प्रमाण वाढत आहे. सतेज पाटील यांची यंत्रणा असूनही शाहु महाराज यांना केवळ 13 हजारांचेच लीड होते. त्यामुळे भाजप जास्त आक्रमक आहे.
भाजपकडून धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी इथून तयारी सुरु केली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारीच जाहीर केली आहे. महाडिक यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळचे संबंध आहेत. आर्थिक पातळीवर ते ताकदवान आहेत. मात्र वडील खासदार आणि शेजारच्याच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून शौमिका महाडिक यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे. त्यामुळे घराणेशाहीवरुन टीका होऊ शकते, हे गृहित धरुन भाजपला कृष्णराज यांच्या उमेदवारीचा विचार करावा लागेल.
महेश जाधव आणि राहुल चिकोडे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गटातील मानले जातात. आम्ही निष्ठावंत आहोत, अजून किती दिवस दुसऱ्याच्या पालख्या वाहायच्या, असा प्रश्न ते करु लागले आहेत. स्वतः पाटील यांनीही तयारी सुरु ठेवण्यास आपल्याला सांगितले असल्याचे चिकोडे सांगतात. उमेदवार म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि नेटवर्कचा अभाव असला तरी एकदा पक्ष पाठीशी असल्यावर आम्ही लढत देऊ शकतो, असा या दोघांचाही दावा आहे. भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने लोकसभेला दणका बसला आहे. तसे पुन्हा नको असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या, अशीही मांडणी हा गट करत आहे.
सत्यजित कदम यांनीही मतदारसंघात बॅनर्स लावून वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. पण दोनवेळा संधी मिळूनही ते पराभूत झाले आहेत. पोटनिवडणुकीत कदम यांनी चांगली लढत दिली, परंतु ते आपल्यातील दोष दूर करुन आपणच या मतदारसंघातील हमखास जिंकणारा उमेदवार आहोत, असा विश्वास निर्माण करू शकलेले नाहीत. संपर्क वाढवला आहे किंवा कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे, असेही त्यांच्या स्वतःच्या सोशल मिडियाच्या अकाऊंट्समध्येही दिसत नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत जेवढ्या सहजपणे उमेदवारी मिळाली तसे चित्र आता नक्कीच नाही.