Download App

Ground Zero : श्रीरामपूरात महाभारत… लहु कानडेंभोवती महायुतीचा चक्रव्यूह!

Shrirampur assembly constituency : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लहू कानडे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असणार?

  • Written By: Last Updated:

अहमदनगर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) यांच्यासाठी हक्काचा मतदारसंघ. पण जिल्ह्यातील दोन मतदारसंघ असे आहेत जिथे काँग्रेसचे (Congress) उमेदवार डोळे झाकून निवडून येतात म्हणजे येतातच. यातील एक संगमनेर आणि दुसरा श्रीरामपूर. संगमनेर विधानसभा मतदारसंघावरील (Sangmner Assembly Constituency) ग्राऊंड झिरो रिपोर्ट आपण यापूर्वीच केलेले आहे. त्याची लिंकही इथे दिलेली आहे. ग्राऊंड झिरोच्या आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत, माजी मंत्री गोविंदराव आदिक, भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे अशा दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या श्रीरामपूर मतदारसंघाबाबत… (Who will be the candidate from the grand coalition against Congress’s Lahu Kande in Srirampur Assembly Constituency)

शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) आणि श्रीरामपूर विधानसभा (Shrirampur Assembly) हे दोन्ही मतदारसंघही अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. पूर्वीपासूनच श्रीरामपूरमधील राजकारणात नेते बदलले, आमदार बदलले, पण वर्चस्व काँग्रेसचेच राहिले. 1990 सालचा जनता दलाचा एक अपवाद वगळता नेहमी काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. आजच्या घडीला या मतदारसंघात आदिक, मुरकुटे आणि ससाणे हे तिन्ही गट कार्यरत आहेत. 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अनेकांनी आपले नशिब अजमाविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे या मतदारसंघात पक्षांबरोबर अपक्षांचीही संख्या मोठी असते.

भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग… शिरीष कोतवाल पुन्हा आमदार होणार?

मतदारसंघ राखीव झाल्यानंतच्या 2009 च्या निवडणुकीतही हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी 59 हजार 819 मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे भाऊसाहेब डोळस यांचा पराभव केला. डोळस यांना 38 हजार 922 मते मिळाली होती. त्यावेळी आठवले गटाचे गेणू कापसे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत 19 हजार 659 मते मिळाली होती. तर अपक्ष विजय शिंदे यांनी 20 हजारांहून अधिक मते घेतली होती.

2014 मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. पण त्यातही काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे दुसऱ्यांदा आमदार झाले. कांबळे यांना 57 हजार 118 मते मिळाली होती. तर भाजपने येथून भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिले होते. ते 45 हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. अधिकारी राहिलेले आणि साहित्यिक लहू कानडे यांनी येथूनच राजकारण एंट्री घेतली होती. त्यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ लढत 37 हजार मते घेतली होती. तर प्रा. सुनीता गायकवाड यांनी राष्ट्रवादीकडून लढत 35 हजार मते घेतली होती.

2019 ला राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये दाखल झाले. विखे यांनी भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत नेले. तेथून उमेदवारी मिळवून दिली. त्याचा फायदा लहू कानडे यांनी उठविला. ते थेट ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आले. त्यांनी लहू कानडे यांना काँग्रेसकडून तिकीट मिळवून दिले. दुरंगी लढतीत लहू कानडे हे 19 हजार मतांनी विजयी झाले. कानडे यांना तब्बल 93 हजार 906 मते मिळाली होती. तर कांबळे यांना 74 हजार 912 मते मिळाली होती.

या मतदारसंघात बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. तसेच मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. मुस्लिम समाजाची बारा हजारांहून अधिक मते आहेत. त्यामुळे दोन्ही घटक विजयासाठी महत्त्वाचे ठरतात.

आता प्रश्न राहतो तो यंदा मतदारसंघ कुणाला जाणार?

महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या वाटेला जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण माजी आमदार भानुदास मुरकुटे, गोविंदराव आदिक यांच्या कन्या आणि श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक हे दोघे महायुतीमध्येच आहेत. श्रीरामपूरचे माजी उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे युवा नेते करण ससाणे यांनीही कानडेंची साथ सोडली आहे. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा मुलगा रोहित हे दावेदारी सांगत आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार लहू कानडे एकाकी पडले आहेत.

याचाच परिणाम म्हणून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना 11 हजारांचे लीड मिळाले होते. लोखंडे यांना 86 हजार आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना 74 हजार मते मिळाली होती. तर वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांना 22 हजार मते मिळाली होती. लोखंडे यांच्याविषयी मोठी नाराजी असताना आदिक आणि मुरकुटे यांच्यामुळे लोखंडेंना लीड मिळू शकले होते.

आता महायुतीमध्ये या मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपही पक्षाकडून दावेदारी आहे. त्यात शिवसेनेला नगर जिल्ह्यातून कोणत्या जागा द्याव्या हा प्रश्न महायुतीपुढे आहे. यात श्रीरामपूर मतदारसंघ दिला जाऊ शकतो. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचा मुलगा प्रशांत लोखंडे हे दावेदारी सांगत आहेत. शिवाय काँग्रेसकडून दोन टर्म आमदार राहिलेले भाऊसाहेब कांबळे हे काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत गेले आहेत. परंतु गेल्या तीन निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेना जिंकू शकलेला नाही.

अमित देशमुखांना ‘देवघरातूनच’ आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?

त्यामुळे आता हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा आणि बौद्ध समाजातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. भाजपकडून ज्येष्ठ पत्रकार मिलिंदकुमार साळवे हेही इच्छुक आहे. कोरोनानंतर एकल महिलांचे जिल्ह्याचे प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडले आहेत. त्याचबरोबर श्रीरामपूर जिल्हा निर्मिती व पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी अनेकदा आवाज उठविला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामार्फत प्रदेश भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. तसेच नेवासा तालुक्यातील नितीन दिनकर हेही भाजपकडून प्रयत्न करत आहेत.

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुपवते या मैदानात उतरू शकतात. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीरामपूरमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. थोडक्यात अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता इथे प्रत्येक पक्षाकडून दावेदार आहेत. पण महाविकास आघाडीत काँग्रेसला आणि महायुतीत शिवसेनेला हा मतदारसंघ जाऊ शकतो. यात आता कोण बाजी मारणार हे निकालातच कळून येईल.

follow us