Lok Sabha Election 2024 : भाजप आणि काँग्रेस देशातील मोठे आणि राष्ट्री पक्ष आहेत. आजमितीस भाजपाचं कमळ आणि काँग्रेसचं हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह आहे. पण, याआधी दोन्ही पक्षांंचं चिन्ह वेगळं होतं. तीन वेळा या चिन्ह बदललं गेलं होतं. त्यातही भाजप केंद्रातील सत्तेत आहे आणि व्यापक जनसमर्थन असणारा पक्ष आहे. काँग्रेसही मोठा पक्ष आहे आणि या पक्षाचे राज्या राज्यात संघटन आहे. या दोन्ही पक्षांच्या निवडणूक चिन्हांची स्टोरी सुद्धा खास आहे. 1951-52 मध्ये देशात पहिल्यांदा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह दोन बैलांची जोडी हे होते. पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनच चिन्हांचा वापर केला जात आहे.
यामागे एक कारण असेही आहे की त्यावेळी देशात साक्षरतेचे प्रमाण खूप कमी होते. अशावेळी मतदारांना चिन्हांच्या माध्यमातून उमेदवार ओळखणे सोपे ठरेल. पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चिन्ह दोन बैलांची जोडी हे होते. तर जनसंघाला ‘दीपक’ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. भाजप आणि काँग्रेसचे निवडणूक चिन्ह तीन तीन वेळा बदलले आहेत. 1952 पासून 1969 पर्यंत दोन बैलांची जोडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह होते.
सर्वाधिक पंतप्रधान अन् दिल्लीच्या सत्तेतही वजन; मोठ्या राज्याची इलेक्शन ‘हिस्ट्री’ही खास…
यानंतर 12 नोव्हेंबर 1969 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आर) नावाने नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाला ‘गाय वासरू’ हे चिन्ह मिळाले. 1971 ते 1977 पर्यंत पक्षाचे हेच चिन्ह राहिले. 1977 मध्ये मात्र इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आर) पासून बाजूला होत काँग्रेस (आय) पक्षाची स्थापना केली. यावेळी त्यांनी ‘हाताचा पंजा’ पक्षाचे चिन्ह बनवले. तेव्हापासून हाताचा पंजा हेच काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.
21 ऑक्टोबर 1951 रोजी अखिल भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात आली होती. राजधानी दिल्लीतील कन्या माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय जनसंघाचा पाया रचण्यात आला. जनसंघाचा झेंडा आयताकार भगव्या रंगाचा होता. याच ध्वजावरील दीपक चिन्हाला निवडणूक चिन्ह म्हणून मान्यता मिळाली.
“मला ऊर्जा ईश्वर देतो, परमात्म्यानेच मला पाठवलं”; PM मोदींच्या वक्तव्याची चर्चा तर होणारच..!
पुढे आणीबाणी नंतर 1977 मध्ये जनसंघाचे जनता पार्टीत विलीनीकरण करण्यात आले. यावेळी नवीन निवडणूक चिन्ह ‘हलधर शेतकरी’ मिळाले होते. यानंतर बरोबर तीन वर्षांनी म्हणजेच 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. यानंतर भाजपला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले.
पहिल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास 29 राजकीय पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली होती. यातील 14 पक्षांना हा दर्जा मिळाला. मात्र निवडणुकीचा निकाल आल्यानंतर फक्त चारच पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेऊ शकले. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रजा सोशलिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय जनसंघ या पक्षांचा समावेश होता.