Gujarat Lok Sabha Election 2024 : आठ वर्षांपूर्वीचा काळ आठवतो का.. गुजरात राज्यात भाजपचं मजबूत सरकार अन् नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. म्हणजेच डबल इंजिनचं सरकार. तरीसुद्धा एका बावीशीतल्या तरुणाने या सरकारला दरदरून घाम फोडला होता. त्यावेळी गुजरातच्या राजकारणात जणू मोठं वादळच उठलं होतं. राज्यात पाटीदार आरक्षण आंदोलनाने उचल खाल्ली होती आणि या आंदोलनाचे नेतृत्व करत होते हार्दिक पटेल. या आंदोलनाने हार्दिकला प्रसिद्धीच्या झोतात आणलं, पुढे काँग्रेसने त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत कार्यकारी अध्यक्ष केलं. लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी खास हेलिकॉप्टरही दिलं. नंतर मात्र राजकारण असं काही फिरलं की आज तेच हार्दिक पाटील भाजपचे आमदार आहेत पण, स्टार प्रचारकाच्या यादीतून गायब झालेत..
25 ऑगस्ट 2015 रोजी अहमदाबादमध्ये पाटीदार आरक्षण आंदोलन समितीच्या महाक्रांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोकांनी हजेरी लावली होती. या लोकांची मुख्य मागणी पाटीदार (पटेल) समाजाला आरक्षणाची होती. या रॅलीचे नेतृत्व हार्दिक पटेल करत होते. त्यावेळी हार्दिक फक्त 22 वर्षांचे होते. या रॅलीमुळेच त्यांचं नाव देशात पोहोचलं.
Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं..
याच आंदोलनामुळे राज्य सरकारलाही हादरे बसले आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनानंतर 2017 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. आंदोलनाचा परिणाम झाला. निवडणुकीत भाजपला फक्त 99 जागा जिंकता आल्या. कसेबसे बहुमत मिळवता आले. तर दुसरीकडे हार्दिक पटेल काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांत गणले जाऊ लागले.
यानंतर हार्दिक पटेलचे काँग्रेसमध्ये वजन वाढत गेले. एक वेळ तर अशी आली होती की काँग्रेसने हार्दिक पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. इतकेच नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी एक खास हेलिकॉप्टर सुद्धा दिले होते. परंतु जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा हार्दिक पटेलचा राजकारणातील प्रभावही ओसरत गेला. आता हार्दिक पटेल भाजपाचे फक्त आमदार बनून राहिले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. पण हार्दिक पटेल राजकारणातून इतके बेदखल झाले आहेत की पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतही त्यांचा समावेश केलेला नाही. भाजपने जी 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे त्यात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, माजी मुख्यमंत्री विजय रूपानी, सीआर पाटील, नितीन पटेल यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. इतकेच काय तर हार्दिक पटेल यांचे माजी सहकारी अल्पेश ठाकोर यांचेही नाव यादीत आहे.
Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार अन् पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार; निंबाळकर VS पाटलांमध्ये लढत
या राजकारणावर भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया देत वेळ मारून नेली जात आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हार्दिक पटेल आता राज्याच्या राजकारणातून साईडलाईन झाले आहेत यात काही शंका नाही. सध्या हार्दिक पटेल सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघातील स्वतःचा विधानसभा मतदारसंघ आणि जवळच्या क्षेत्रात प्रचार करत आहेत.
पाटीदार आंदोलन आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका या काळात हार्दिक पटेल प्रचंड चर्चेत होते. त्याकाळच्या त्यांच्या भाषणात भाजप टार्गेट होता. प्रधानमंत्री मोदी, अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका हाच त्यांच्या भाषणाचा मुख्य आधार होता. भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवला नाही तर गुलामगिरीची वेळ येईल असे हार्दिक पटेल म्हणत होते पण काळाचा महिमा पाहा आता हार्दिक पटेल त्याच भाजपाचे आमदार म्हणून मिरवत आहेत.