Nawab Malik : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला होता. महायुतीला फक्त 17 जागांवर विजय मिळवता आले होते. त्यामुळे आतापासून महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.
यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी विधानसभा आणि 11 जागांवर होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांनी हजेरी लावली होती. तसेच आतापर्यंत अजित पवार गटापासून दूर राहणारे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देखील या बैठकीला हजेरी लावल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी झालेल्या या बैठकीत नवाब मलिक उपस्थित असल्याने त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
जुलै 2023 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती तेव्हा नवाब मलिक यांनी तटस्थ राहण्याची भूमिका मांडली होती . तसेच महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील नवाब मलीक यांचा विरोध केला होता. मात्र आज नवाब मलिक अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीला हजर राहिल्याने आता त्यांनी आपला पाठिंबा महायुतीला दिला आहे का? याबाबत आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे महायुतीला आपला पाठिंबा आहे किंवा नाही याबाबत नवाब मलिक यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.
Rahul Gandhi: राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला येणार?, शरद पवारांनी दिलं निमंत्रण
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून पाच जागांवर उमेदवार देण्यात आले होते मात्र अवघ्या एक जागेवर अजित पवार गटाला विजय मिळवता आला होता. त्यानंतर अजित पवार महायुतीमध्ये राहणार नाही अशी चर्चा सुरु झाली होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार महायुतीमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं होते.