STAGE OTT : ‘प्रेमायण’ मधून उलगडणार एक सत्य प्रेमकथा; भिमराव मुडेंची नवी कलाकृती ‘स्टेज ओटीटीवर’
STAGE OTT : ‘बार्डो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासह ‘अंधार माया’, ‘रुद्रम’ 'डावपेच' आणि ‘कौल मनाचा' 'तारिणी'अशा विविध कलाकृतींमधून
STAGE OTT : ‘बार्डो’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटासह ‘अंधार माया’, ‘रुद्रम’ ‘डावपेच’ आणि ‘कौल मनाचा’ ‘तारिणी’अशा विविध कलाकृतींमधून आपल्या वेगळ्या दिग्दर्शकीय शैलीचा ठसा उमटवणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे आता ‘प्रेमायण’ या नव्या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा गंध, मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि भावभावनांचे विविध पैलू आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे मांडणारे भिमराव मुडे यावेळी प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाच्या संघर्षाने रंगलेले अनोखे कथाविश्व प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि मातीतल्या कथा सादर करणाऱ्या स्टेज ओटीटी (STAGE OTT) या व्यासपीठावर ‘प्रेमायण’ ही वेबसिरीज १६ ऑक्टोबर २०२६ पासून प्रदर्शित होणार आहे.
‘बार्डो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या भिमराव मुडे यांच्या सर्जनशील प्रवासातील ‘प्रेमायण’ हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या वेबसिरीजचे ते क्रिएटर असून, राजेश पाठक (कंटेंट हेड स्टेज मराठी) यांच्या कथेला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भिमराव मुडे यांच्या संकल्पनेची जोड लाभली आहे.आरा मल्टिमीडिया निर्मित या वेब सिरीजचे दिग्दर्शन राजेश वराडकर आणि विशाल सांगळे यांनी केले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव, मानवी नात्यांमधील भावनिक गुंतागुंत आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू यांची प्रभावी गुंफण करत ‘प्रेमायण’ मधून प्रेम, प्रतिष्ठा आणि सूडाचे अनोखे कथाविश्व उलगडणार आहे.
ग्रामीण महाराष्ट्राची पार्श्वभूमी, जातीव्यवस्था,प्रेमातील गुंतागुंत, प्रतिष्ठेचा संघर्ष, सत्तेची समीकरणे आणि सूडाची धग यांचा थरारक संगम ‘प्रेमायण’मध्ये अनुभवायला मिळणार आहे. प्रेमाच्या वाटेवर उभे राहणारे सामाजिक अडथळे, प्रतिष्ठेसाठी सुरू असलेली धडपड आणि वैयक्तिक संघर्षांतून निर्माण होणारे नाट्य यांमुळे या सिरीजचे कथाविश्व अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहे. नात्यामागची एक वेगळी बाजू आणि प्रत्येक निर्णयामागची एक वेगळी कहाणी ‘प्रेमायण’मधून उलगडणार आहे. ही कथा प्रेक्षकांना केवळ गुंतवून ठेवणार नाही, तर त्यांना विचार करायलाही भाग पाडेल, असा विश्वास भिमराव मुडे यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळले; विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू-
‘प्रेमायण’ या सिरीजमध्ये हार्दिक जोशी, अभिनव कुरणे, प्रतीक्षा पोकळे, ओमप्रकाश शिंदे, उमेश जगताप, शुभांगी भुजबळ, पल्लवी ओंकार आणि विनोद लव्हेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दमदार कलाकारांची फळी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले कथानक यांमुळे या सिरीजबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या ‘बार्डो’ पासून ते ‘प्रेमायण’च्या नव्या डिजिटल प्रवासापर्यंत भिमराव मुडे यांची सर्जनशील वाटचाल सातत्याने नवनवीन विषयांना स्पर्श करणारी ठरली आहे. प्रेम, प्रतिष्ठा, सत्ता आणि सूड यांच्या संघर्षातून उलगडणारे ‘प्रेमायण’ चे कथाविश्व प्रेक्षकांना कितपत भावते आणि मराठी वेबविश्वात कोणती नवी छाप उमटवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.