‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’कडून ‘राजा शिवाजी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
Raja Shivaji Trailer Launch- रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.
Raja Shivaji Trailer Launch : ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा आज मुंबई मध्ये पार पडला. निर्मात्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर, मराठी आणि हिंदी अशा दोन्हीं भाषांमध्ये, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. रितेश विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शन, अभिनय, लेखन आणि निर्मिती अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळलेला हा चित्रपट भारतातील सर्वश्रेष्ठ शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे.
बाळ शिवाजी ते राजा शिवाजी पर्यंतच्या प्रवासात ‘हिंदवी स्वराज्य’ स्वप्न उराशी बाळगून, ध्येयनिष्ठतेने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात प्रचलित नसलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक पैलूंना नव्या दृष्टिकोनातून सादर करण्यात आले आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज या कार्यक्रमाला जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेता- लेखक रितेश विलासराव देशमुख, तसेच संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, जिनिलीया देशमुख आणि संगीतकार जोडी अजय-अतुल उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली.
या चित्रपटाचे दिग्दर्शक, मुख्य अभिनेता, लेखक आणि निर्माता रितेश विलासराव देशमुख म्हणतात, “जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतो, तेव्हा त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची आणि महानतेची व्याप्ती शब्दांत मांडणे खरोखरच कठीण होते. त्यांच्याबद्दलचा आपला आदर, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करताना ते नेहमीच मनाच्या गाभाऱ्यातून उमटते. गेल्या दहा वर्षांपासून मी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट साकार करण्याचा प्रयत्न करत होतो. अखेर २०२३ मध्ये जेव्हा आम्ही या प्रवासाची सुरुवात केली, तेव्हा मनात एक वेगळीच भावना होती. जणू खुद्द महाराजच सांगत होते, “आता तुझी वेळ आली आहे.” कारण केवळ स्वप्ने पाहून गोष्टी साकार होत नाहीत; त्यांना वास्तवात आणण्यासाठी भक्कम पाठिंबा आणि विश्वासाची गरज असते. तसेच ‘जिओ स्टुडिओज’ आणि ज्योती देशपांडे यांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ते धाडस दाखवले, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही जे स्वप्न पाहिले होते, त्याचा मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. एक संपूर्ण टीम म्हणून, आम्ही हा चित्रपट महाराजांच्या चरणी एक विनम्र अर्पण म्हणून सादर करत आहोत.”
जिओ स्टुडिओजच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी सांगितले की, “कलाकारांचा संच आणि हृदयस्पर्शी संगीताच्या जोरावर, ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो भारताच्या आत्म्याचा, अस्मितेचा आणि समृद्ध इतिहासाचा भव्य घोष आहे. ‘जिओ स्टुडिओज’मध्ये आमची ध्येयवेडी वाटचाल नेहमीच अशा कथा साकारण्याची राहिली आहे, ज्या आपल्या मातीत खोलवर रुजलेल्या आहेत आणि तरीही जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. ‘धुरंधर’ या दुहेरी मालिकेच्या अभूतपूर्व यशाने हे ठामपणे सिद्ध केले आहे की, प्रभावी, स्वदेशी कथांशी प्रेक्षकांचे नाते अतूट असते. विशेषतः जेव्हा त्या निडरपणे आणि भव्यतेच्या परमोच्च स्तरावर मांडल्या जातात. ‘राजा शिवाजी’द्वारे आम्ही हीच परंपरा अधिक उंचीवर नेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा नव्या तेजाने सजीव करत आहोत. धैर्य, दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्याचे अद्वितीय प्रतीक, ज्यांचा विराट वारसा आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणेचा अखंड स्रोत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “या दंतकथेच्या पाठीमागची मानवी कहाणी, त्यांची अप्रतिम रणनीतिक बुद्धिमत्ता आणि अदम्य शौर्य यांना तितक्याच ताकदीने उलगडण्याची आमची जिद्द होती. रितेश आणि त्यांच्या टीमने केवळ दृश्यवैभवापलीकडे जाऊन, एका नेत्याच्या घडणीचा प्रवास, त्यांची मूल्ये आणि त्यांना आकार देणाऱ्या शक्तींचा सखोल व प्रभावी वेध घेणारी कथा घडवली आहे. अस्सलता, अफाट भव्यता, दमदार कलाकारांचा ताफा आणि आत्म्याला भिडणारे संगीत यांच्या जोरावर ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आमच्या भारतीय कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत तितक्याच ताकदीने आणि तितक्याच हृदयस्पर्शीपणे पोहोचवण्याच्या आमच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हा केवळ एक सिनेमॅटिक अनुभव नाही, तर भारताच्या अभिमानाला वाहिलेली प्रभावी आदरांजली आहे; जी आपल्या इतिहासाच्या पानांना नव्या तेजाने जिवंत करते आणि प्रत्येक पिढीच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करते.”
अभिनेत्री आणि निर्माती (मुंबई फिल्म कंपनी) जिनिलीया देशमुख यांनी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी बोलताना सांगितले की, “आज मी अत्यंत भावूक झाले आहे. या संकल्पनेला निर्मितीपासून ते कला दिग्दर्शनापर्यंत प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी एकत्र येऊन हातभार लावला, त्या संपूर्ण टीमची आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीची मी मनापासून ऋणी आहे. प्रत्येकानेच अफाट सकारात्मकता, दृढ विश्वास आणि निस्सीम प्रेम सोबत आणले; आणि याच गोष्टींनी खऱ्या अर्थाने या चित्रपटाला आजचे हे सुंदर स्वरूप प्राप्त झाले आहे. केवळ एक चित्रपटच नव्हे, तर ‘राजा शिवाजी’ ही त्या महान विभूतीला, त्यांच्या जीवनकार्याला, त्यांच्या अमूल्य वारशाला आणि त्यांनी ज्या मूल्यांचे प्रतिनिधित्व केले, त्या सर्वांना आम्ही अर्पण केलेली एक मनापासूनची आदरांजली आहे. तसेच हा केवळ एक प्रकल्प नाही, तर ती एक मोठी जबाबदारी आहे आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची संधी आम्हाला मिळाली, ही आमच्यासाठी खरोखरच परमकृपा आणि अभिमानाची बाब आहे.”
एका साध्या आणि संघर्षमय सुरुवातीपासून ते एका अजिंक्य योद्धा-राजाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीवर केंद्रित आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य आणि पॅन-इंडिया स्तरावर उभा राहणाऱ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात असून, त्याची व्यापकता, नेत्रदीपक दृश्यरचना, थरारक ॲक्शन आणि उच्च दर्जाची तांत्रिक मांडणी यांमुळे तो आधीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आता प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच उंचावणार आहे.
या चित्रपटात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे.
‘जिओ स्टुडिओज प्रस्तुत’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वाभिमान आणि प्रेरणादायी जीवनप्रवास भव्य आणि नेत्रदीपक पद्धतीने मोठ्या पडद्यावर साकारला जाणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.