इम्तियाज अलीच्या ‘मैं वापस आऊंगा’ चित्रपटातील दिलजीत दोसांझ आणि ए.आर. रहमान यांचे ‘क्या कमाल है’ हे गाणे प्रदर्शित
दिलजीत दोसांझ आणि ए. आर. रहमान यांच्या आवाज आणि संगीताने सजलेलं नवं गाणं ‘क्या कमाल है’ आज रिलीज झालं आहे.
The song ‘Kya Kamal Hai’ was released : या वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित म्युझिकल कोलॅबोरेशन अखेर आज प्रेक्षकांसमोर आलं आहे. दिलजीत दोसांझ आणि ए. आर. रहमान यांच्या आवाज आणि संगीताने सजलेलं नवं गाणं ‘क्या कमाल है’ आज रिलीज झालं आहे. हा सुंदर ट्रॅक इम्तियाज़ अली यांच्या आगामी ‘Main Vaapas Aaunga’ या चित्रपटातील पहिलं गाणं असून, आशा आणि प्रेमाचा संदेश देणारं आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘Amar Singh Chamkila’ या चित्रपटाद्वारे जादू निर्माण केल्यानंतर ही टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत गीतकार इरशाद कामिल देखील आहेत. त्यांच्या संवेदनशील शब्दांनी या गाण्याला अधिकच गहिरेपणा दिला आहे. ‘क्या कमाल है’ हे फक्त एक गाणं नाही, तर एक अशी अनुभूती आहे जी कठीण काळातही आशेची किरण दाखवते.
इम्तियाज़ अली यांच्या चित्रपटांमध्ये संगीत हा नेहमीच कथानकाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे, आणि यावेळीही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. ‘क्या कमाल है’ हे एक “Song of Hope” म्हणून समोर येत असून, भारताचा फाळणी काळ या काळातही जिवंत राहिलेल्या प्रेमकथांपासून प्रेरित आहे. आजच्या गोंधळ आणि अस्थिरतेच्या वातावरणात हे गाणं आपल्याला आठवण करून देतं की जगात अजूनही प्रेम, शांतता आणि आपुलकी शिल्लक आहे.
इम्तियाज़ अली म्हणाले, आजच्या काळात जग अनेक संकटांमधून जात असताना, हे गाणं लोकांना सकारात्मकता आणि आशा देण्याचा प्रयत्न करतं. तर दिलजीत दोसांझ यांनी हे गाणं आपल्या मनाच्या खूप जवळचं असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, हे गाणं कोणत्याही बनावटीशिवाय, प्रामाणिकपणे थांबून अनुभवण्याची संधी देतं.
ए. आर. रहमान यांनीही या सहकार्याबद्दल सांगितलं, की हा एक सतत सुरू असलेला सर्जनशील संवाद आहे. चित्रपटाच्या जुदाई आणि विस्थापन या थीमला लक्षात घेऊन असं संगीत तयार करण्यात आलं आहे, जे शांतता आणि समाधानाची जाणीव करून देतं. त्यांच्या मते, ‘क्या कमाल है’ हे त्या सौंदर्याला उजाळा देतं, जे आपण अनेकदा जगाच्या गोंधळात दुर्लक्षित करतो.
गीतकार इरशाद कामिल यांनी या गाण्याला एक स्वप्न म्हटलं आहे—असं स्वप्न ज्यात ना वेदना आहे, ना भीती. त्यांच्या शब्दांत, हे गाणं अशा जगाची कल्पना करतं जिथे फक्त प्रेम, शांतता आणि आशा आहे.
दरम्यान, म्युझिक लेबलबाबत बोलताना कुमार तौरानी म्हणाले, “Tips Industries मध्ये आम्ही मानतो की संगीत हे भारतीय सिनेमाचं हृदय आहे. दिलजीत दोसांझ आणि ए. आर. रहमान यांचं हे पहिलं ओरिजिनल कोलॅबोरेशन, तेही इम्तियाज़ अली यांच्या कथेसोबत, ‘क्या कमाल है’ ला विशेष बनवतं. हे गाणं श्रोत्यांच्या मनाला भिडतं आणि संपल्यानंतरही बराच काळ त्यांच्यासोबत राहतं. अर्थपूर्ण आणि आत्म्याला भिडणारं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नाचं हे प्रतीक आहे.”
‘Main Vaapas Aaunga’ या चित्रपटात दिलजीत दोसांझ यांच्यासोबत नसीरुद्दीन शाह, शरवरी वाघ आणि वेदांग रैना महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट Applause Entertainment आणि Window Seat Films यांच्या निर्मितीत तयार झाला असून, संगीत Tips Industries अंतर्गत रिलीज करण्यात आलं आहे.
हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, ‘क्या कमाल है’ या गाण्यामुळेच चित्रपटाने आधीच प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आता या चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावरील प्रदर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.