लावणीच्या ध्यासाची गोष्ट सांगणाऱ्या झी स्टुडिओजच्या; ‘फुलवरा’ चित्रपटाचा अस्सल बावनकशी टीझर प्रदर्शित

Phulwara Teaser : कलावंत कोणत्याही प्रांतातील असो, कोणत्याही क्षेत्रातील असो त्याच्या कलेच्या स्वप्नपुर्तीच्या प्रवासासाठी महत्त्वाचा

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Phulwara Teaser

Phulwara Teaser : कलावंत कोणत्याही प्रांतातील असो, कोणत्याही क्षेत्रातील असो त्याच्या कलेच्या स्वप्नपुर्तीच्या प्रवासासाठी महत्त्वाचा असतो तो ध्यास. हा ध्यास कलावंताला अनेक अग्नीदिव्य पार करायला लावतो आणि यातून जो कलावंत तयार होतो तो असतो कलेचा अस्सल उपासक. त्यामुळे त्याच्याकडून सादर होणारी कलासुद्धा तेवढीच अस्सल आणि पवित्र असते. कलेच्या याच ध्यासाचं सार सांगताना घुंगरु पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं असं समर्पणाचं तत्व सांगणारा फुलवरा चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेला आणि रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेला फुलवरा हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण तयार झालं आहे. ही उत्सुकता यातील कलाकारांविषयी आहे, यातील संगीताबद्दल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाची कथा काय असेल ? याबद्दलची आहे. या टीझरमधून तर ही उत्सुकता आणखीनच जास्त वाढली आहे. यामध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दिसत नाही तर दिसत आहेत ते त्यांचे पाय, त्यातील घुंगरु आणि त्यांचा प्रवास. हा प्रवास कुठे जल्लोषपूर्ण आह, कुठे अडखळणारा आहे तर कुठे रक्ताने माखलेलाही आहे. यासोबतच दिसतो तो देवीला फुलवरा वाहतानाचे काही हात, ढोलकीवर थाप मारणारे, तबल्यावर ताल धरणारे काही हात आणि त्या तालावर बेभान होऊन नाचणारे पाय आणि या सगळ्यांत कळसाध्याय गाठणारं हर्ष – विजय यांचं संगीत. एकंदरीत लावणी कलावंतांच्या जीवनाचा एक मोठा प्रवास यातून बघायला मिळणार याची प्रचिती या टीझरमधून येत आहे.

साधारणपणे सतरा वर्षांपूर्वी आलेल्या नटरंग चित्रपटाने केवळ लावणीलाच नाही तर मराठी चित्रपटांनाही नवसंजीवनी देण्याचं काम केलं होतं. या चित्रटाने मराठी मनोरंजनविश्वात एक इतिहास रचला होता. आता पुन्हा एकदा लावणी आणि तमाशाच्या विश्वाचा प्रभावी अनुभव देण्यासाठी झी स्टुडिओज आणि रवी जाधव फुलवरा हा चित्रपट घेऊन येत आहेत.यावेळीही केवळ रंगमंचावरचा झगमगाट न दाखवता, त्या झगमगाटामागे असलेली मेहनत, कलाकारांची धडपड आणि कलेशी जोडलेलं त्यांचं भावविश्व चित्रपटातून उलगडण्याची उत्सुकता आहे.

‘फुलवरा’बद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “लावणीचा विचार करताना आपल्या डोळ्यांसमोर तिचा ठेका, रंगमंचावरची ऊर्जा आणि कलाकारांची अदाकारी येते, पण या प्रत्येक गोष्टीमागे असते ती वर्षानुवर्षांची मेहनत आणि कलेशी असलेली अतूट बांधिलकी. ‘फुलवरा’च्या टीझरमधून आम्हाला हाच भाव पोहोचवायचा होता. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलींच्या पायांतले घुंगरू आणि त्यांना लागलेले रक्त-माती ही त्या प्रवासाची प्रतीकं आहेत. ‘घुंगरू पायाला नाही गं, काळजाला बांधून नाचावं!’ ही ओळ आमच्यासाठी केवळ संवाद नाही, तर लावणी जगणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या भावनेचं प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्राच्या या समृद्ध लोककलेमागची जिद्द, तिच्यावरचं प्रेम आणि ती जपण्यासाठी घेतले जाणारे कष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, हा ‘फुलवरा’मागचा प्रामाणिक प्रयत्न आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “मराठी लोककलेचा वारसा मोठा आहे आणि हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘फुलवरा’च्या टीझरमधून लावणीच्या केवळ आकर्षक बाजूचं दर्शन घडत नाही, तर या कलेसाठी आवश्यक असलेल्या मेहनतीची आणि समर्पणाची जाणीवही होते. घुंगरांचा नाद हा कलाकाराच्या पायांपुरता मर्यादित नसतो, तर तो त्याच्या मनातल्या स्वप्नांशी जोडलेला असतो. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनातून ही भावना मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे उलगडेल, असा आम्हाला विश्वास आहे. झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा अस्सल मराठी मातीशी नातं सांगणारी, आपल्या लोककलेचा अभिमान जागवणारी कलाकृती अनुभवायला मिळणार आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”

लोककलेच्या विश्वात आपल्या वेगळ्या सादरीकरणाने लक्ष वेधून घेणाऱ्या ‘द फोक आख्यान’च्या हर्ष-विजय या संगीतकार जोडीने ‘फुलवरा’ला संगीत दिलं आहे. ‘द फोक आख्यान’चे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत. लोकसंगीताची परंपरा, त्यातील अस्सलपणा आणि आजच्या पिढीशी संवाद साधणारी मांडणी यांचा संगम या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे आणि कथानक अद्याप गुलदस्त्यात असले, तरी टीझरने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, हे नक्की !

follow us