नेतन्याहूंचा अमेरिकेला मोठा इशारा! भारताला महासत्ता म्हणत इस्रायलच्या नव्या रणनीतीची घोषणा
इस्रायल आता अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करून नवी जागतिक समीकरणं तयार करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Netanyahu’s major warning to the US : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशाच्या नव्या सुरक्षा धोरणाची घोषणा करत जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भविष्यात अमेरिकेत इस्रायलविरोधी भूमिका घेणारा राष्ट्राध्यक्ष सत्तेवर येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करत नेतन्याहू यांनी भारतासारख्या महासत्तांशी संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे इस्रायल आता अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करून नवी जागतिक समीकरणं तयार करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
इस्रायलमध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. अमेरिकेतील राजकीय परिस्थिती भविष्यात बदलू शकते आणि इस्रायलविरोधी धोरण स्वीकारणारा राष्ट्राध्यक्ष सत्तेवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी इस्रायलने आतापासूनच पर्यायी धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा मिळत असतानाच नेतन्याहू यांनी हे विधान केल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. अमेरिकेसोबतचे संबंध महत्त्वाचे असले, तरी भविष्यातील बदलांचा विचार करून इस्रायलने स्वतःची संरक्षण आणि मुत्सद्दी ताकद वाढवली पाहिजे, असा त्यांचा सूर आहे. नव्या जागतिक भागीदारीबाबत बोलताना नेतन्याहू यांनी भारताचा विशेष उल्लेख केला. भारत हा छोटा देश नसून एक महासत्ता असल्याचं सांगत त्यांनी भारतासोबतचे धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याची भूमिका मांडली. भारतासह लॅटिन अमेरिकेतील देशांशी सुरक्षा आणि व्यापारविषयक सहकार्य वाढवण्यावरही त्यांनी भर दिला.
गोकुळचा गड महायुती राखणार की सतेज पाटील सत्तांतर घडवणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूरच्या निकालाकडे!
इस्रायलसाठी भारत हा संरक्षण, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे बदलत्या जागतिक परिस्थितीत भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याच्या नेतन्याहू यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, नेतन्याहू यांच्या नव्या सुरक्षा धोरणावर इस्रायलमधील विरोधकांनी टीका केली आहे. माजी लष्करप्रमुख आणि विरोधी नेते गादी आयझेनकोट यांनी या घोषणेला राजकीय स्टंट ठरवलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेमध्ये भीती निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशासमोर अनेक सुरक्षा आव्हानं असताना केवळ धोरण जाहीर करून परिस्थिती बदलणार नाही, अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांचं समर्थन केलं असलं, तरी इस्रायलमधील निवडणुकीत त्यांच्यासमोर राजकीय आव्हान कायम आहे. इस्रायलमध्ये मतदार थेट पंतप्रधानांची निवड करत नाहीत, तर संसदेतील जागांच्या संख्येवरून सरकार स्थापन होतं. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा, अमेरिकेसोबतचे संबंध आणि भारतासारख्या देशांशी वाढणारं सहकार्य हे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतात.
एकूणच, भविष्यात अमेरिकेच्या धोरणात बदल झाला, तरी इस्रायलच्या सुरक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी नेतन्याहू पर्यायी जागतिक भागीदारी मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचं त्यांच्या विधानातून दिसतं. भारताला महासत्ता म्हणत इस्रायलच्या सुरक्षा धोरणात महत्त्वाचं स्थान देणाऱ्या नेतन्याहू यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. मात्र, या घोषणांचा प्रत्यक्ष परिणाम किती होतो आणि निवडणुकीत इस्रायली जनता नेतन्याहू यांना पुन्हा संधी देते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.