थायलंडचा भारतीयांना दणका ! व्हिसा-फ्री प्रवेश बंद; आता ‘व्हिसा ऑन अरायव्हल’साठी शुल्क भरावे लागणार
Thailand - बेकायदेशीर कृत्यामध्ये भारतीय नागरिक सहभागी होत असल्याने थायलंडने ही कारवाई केलीय. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी लागू असलेली 60 दिवसांची व्हिसा-फ्री एंट्री योजना बंद केली आहे.
Thailand Scraps 60-Day Visa-Free Stay For Indians: तुम्ही थायलंडला फिरण्यासाठी बॅग पॅक करत असाल तर थांबा थायलंड सरकारने भारतीयांना एक मोठा दणका दिलाय. बेकायदेशीर कृत्यामध्ये भारतीय नागरिक सहभागी होत असल्याने थायलंडने ही कारवाई केलीय. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी लागू असलेली 60 दिवसांची व्हिसा-फ्री एंट्री योजना बंद केलीय. आता भारताला पुन्हा ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ (VoA) श्रेणीत टाकण्यात आलाय. त्यामुळे आता भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये प्रवेशासाठी विमानतळावर व्हिसा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसेच शुल्क भरावे लागणार आहे.
थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने 19 मे रोजी नवीन व्हिसा नियमांना मंजुरी दिली. नव्या धोरणानुसार भारताला व्हिसा-फ्री यादीतून वगळण्यात आलंय. भारताला व्हिसा ऑन अराव्हयल श्रेणीत टाकण्यात आलायं. अझरबैजान, बेलारूस आणि सर्बिया हेही व्हिसा ऑन अरायव्हल श्रेणीत आहेत.
आता किती दिवस राहता येणार?
यापूर्वी भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय 30 ते 60 दिवस थायलंडमध्ये राहण्याची परवानगी होती. मात्र नव्या नियमांनुसार आता भारतीय पर्यटकांना फक्त 15 दिवस राहता येईल. यासाठी प्रति व्यक्ती 2000 थाई बाट म्हणजेच 6 हजार रुपये इतका व्हिसा शुल्क भरावे लागेल.
कोणत्या देशांना व्हिसा सूट कायम?
थायलंड सरकारने आता फक्त 54 देशांच्या नागरिकांना 30 दिवसांची व्हिसा सूट कायम ठेवलीय. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर तसेच अनेक युरोपीय देशांचा समावेश आहे. याशिवाय काही देशांसाठी परस्पर कराराच्या आधारे ‘रेसिप्रोकल व्हिसा सूट’ लागू करण्यात आली आहे.
90 दिवसांची व्हिसा सूट : अर्जेंटिना, पेरू, चिली, ब्राझील आणि दक्षिण कोरिया
30 दिवसांची व्हिसा सूट : चीन, हाँगकाँग, रशिया, लाओस, मकाऊ, तिमोर-लेस्ते आणि कझाकिस्तान
14 दिवसांची व्हिसा सूट : कंबोडिया आणि म्यानमार (फक्त हवाई प्रवासासाठी)
थायलंडने नियम कडक का केले?
कोरोना महामारीनंतर थायलंडच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला होता. देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा 10 टक्क्यांहून अधिक वाटा असल्याने सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये अनेक देशांसाठी व्हिसा-फ्री योजना सुरू केली होती. भारतालाही त्याचा लाभ मिळाला होता. जुलै 2024 मध्ये ही मुदत वाढवून 60 दिवस करण्यात आली होती. काही विदेशी नागरिकांनी या सवलतीचा गैरवापर केल्याचे प्रकार समोर आले. तिथेल पर्यटन आणि क्रीडा मंत्र्यांनी काही देशांतील नागरिकांवर गंभीर आरोप केलेत. काही जण ड्रग्स तस्करी, सेक्स ट्रॅफिकिंग तसेच बेकायदेशीर हॉटेल आणि शाळा चालविण्यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे आढळले. यानंतर सरकारने व्हिसा नियम कडक करण्याचा निर्णय घेतला.
भारतीयांना आता काय करावे लागणार?
आता भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर विमानतळावर ‘व्हिसा ऑन अरायव्हल’साठी अर्ज करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे सादर करून व्हिसा शुल्क भरल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.