डाळींच्या दरात मोठी उसळी; उडीद, तूर आणि मसूर महागल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले
गेल्या काही दिवसांत घाऊक बाजारात उडीद, तूर आणि मसूर डाळींच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
Sharp rise in pulse prices : देशभरात खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. भाजीपाला, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंनंतर आता डाळींचे दरही झपाट्याने वाढू लागले आहेत. विशेषतः सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना डाळींच्या किमतीतील वाढीमुळे गृहिणी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत घाऊक बाजारात उडीद, तूर आणि मसूर डाळींच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील दरांवरही होत असून ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
उडीद डाळीच्या दरात एका दिवसात 15 टक्क्यांहून अधिक वाढ
23 ऑगस्ट रोजी घाऊक बाजारात उडीद डाळीच्या किमतीत तब्बल 15.29 टक्क्यांची वाढ झाली. या वाढीनंतर उडीद डाळीचा सरासरी घाऊक दर 10 हजार 238 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. काही बाजार समित्यांमध्ये हा दर 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत नोंदवण्यात आला. घाऊक बाजारातील या वाढीचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे. सध्या खुल्या उडीद डाळीचे दर 120 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. पॅकेज्ड डाळींच्याही किमती वाढल्या असून एका किलोच्या काही ब्रँडेड उडीद डाळीच्या पॅकेटसाठी ग्राहकांना 175 रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागत आहे. सेंद्रिय आणि प्रक्रिया न केलेल्या उडीद डाळीच्या पॅकेट्सचे दरही लक्षणीयरीत्या वाढले आहेत.
जामखेडच्या आनंद मेळाव्यात थरार; हवेत फिरणाऱ्या पाळण्यातून तरुणी खाली कोसळली, व्हिडीओ व्हायरल
तूर डाळीनेही गाठला उच्चांक
उडीद डाळीनंतर तूर डाळीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. 23 ऑगस्ट रोजी घाऊक बाजारात तूर डाळीच्या दरात 19.51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या वाढीनंतर तूर डाळीचा सरासरी घाऊक दर 9 हजार 50 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. काही ठिकाणी हा दर 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. घाऊक बाजारातील वाढीचा परिणाम किरकोळ बाजारात स्पष्टपणे जाणवत असून खुल्या तूर डाळीचे दर 140 ते 160 रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहेत. तर विविध ब्रँडच्या पॅकेज्ड तूर डाळीचे दर 175 ते 195 रुपये प्रति किलोदरम्यान असल्याचे दिसत आहे.
मसूर डाळीच्या दरात विक्रमी उसळी
24 ऑगस्ट रोजी मसूर डाळीच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. प्रमुख घाऊक बाजारांमध्ये मसूर डाळीच्या दरात एका दिवसात तब्बल 35.28 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली. या वाढीनंतर मसूर डाळीचा सरासरी घाऊक दर 10 हजार 672 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. काही बाजारांमध्ये मसूर डाळीचा दर 12 हजार 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत नोंदवण्यात आला आहे. मसूर डाळीच्या वाढत्या दरांचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसू लागला असून खुल्या मसूर डाळीचे दर 110 ते 130 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर पॅकेज्ड मसूर डाळीचे दर 140 ते 149 रुपये प्रति किलोदरम्यान आहेत.
‘आता सुट्टी नाही’, मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, ‘28 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न केल्यास सरकारची मस्ती उतरवणार’
सणासुदीच्या काळात महागाईची चिंता वाढली
उडीद, तूर आणि मसूर या दैनंदिन वापरातील प्रमुख डाळींच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे गणित बिघडू लागले आहे. आधीच खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर किराणा वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता डाळींसाठीही अधिक खर्च करावा लागत आहे. सणासुदीचा हंगाम जवळ येत असताना डाळींच्या दरातील ही वाढ कायम राहिल्यास महागाईचा आणखी मोठा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत डाळींचे दर स्थिर होतात की आणखी वाढतात, याकडे ग्राहकांसह व्यापाऱ्यांचेही लक्ष लागले आहे.