नवीन भाडे नियम 2026 : आता घरमालकांच्या मनमानीला लागणार चाप ?
New Rent Rules 2026-या नियमात घरमालक, भाडेकरू यांना कोणते सरंक्षण मिळणार आहे. दोघांनीही कोणते नियम पाळणे आवश्यक आहेत.
New Rent Rules 2026: तुम्ही भाडेकरू किंवा घरमालक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण त्यामुळे आता देशात नवीन भाडे नियम 2026 लागू होत आहे. या नियमात घरमालक, भाडेकरू यांना कोणते सरंक्षण मिळणार आहे. दोघांनीही कोणते नियम पाळणे आवश्यक आहेत. हेच आपण लेट्सअप मनीमध्ये जाणून घेऊया…(New Rent Rules 2026: Deposit Caps, Privacy, Digital Agreements)
करार न केल्यास पाच हजारांचा दंड
नवीन भाडेनियमानुसार दोघांनाही अधिकृतपणे करार करावे लागणार आहे. या करारात किती डिपॉझिट, किती भाडे घेतले जाणार आहे, याचा उल्लेख आवश्यक आहे. अधिकृतपणे कराराची नोंदणी न केल्यास घरमालकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. अनेकदा या नियमाचे उल्लंघन केल्यास जास्त दंड भरावा लागणार आहे.
घरमालक किती डिपॉझिट घेऊ शकतो ?
नवीन नियमात घरमालकाला किती डिपॉझिट द्यावे लागणार आहे हेही स्पष्ट केलंय. घरमालक सुरक्षा ठेव म्हणून दोन महिन्यांपेक्षा जास्त भाडे आकारू शकत नाही. म्हणजे एखाद्याला घराला महिन्याला दहा हजार रुपये भाडे असेल तर सुरक्षा ठेव म्हणून वीस हजार रुपयेच डिपॉझिट द्यावे लागणार आहे. तर व्यावसायिक मालमत्तेसाठी सहा महिन्यांचे भाडे डिपॉझिट देण्याचा नियम आहे.
अचानक भाडेवाढीला लागणार असा ब्रेक ?
नवीन नियमात भाडेवाढीला ब्रेक लावण्यात आलेला आहे. घरमालक वर्षानंतर भाडेवाढ करू शकतो. भाडेवाढ करण्यापूर्वी 90 दिवस आधी घरमालकाला भाडेकरूला लेखी सूचना द्यावी लागणार आहे. याचा उल्लेख स्पष्टपणे भाडे करारात करावा लागणार आहे. घरमालकाने अचानक पणे भाडेवाढ केल्यास भाडेकरूला प्रशासनाकडे तक्रार करता येईल.
नवीन नियम भाडेकरूंना कसे संरक्षण देणार ?
नवीन भाडे नियमाने भाडेकरुंना संरक्षण मिळणार आहे. कारण घरमालकाला भाडेकरूला कधीही घरातून बाहेर काढता येणार नाही. घरमालक भाडेकरूंना धमकी देऊन, पाणी किंवा वीज खंडित करून घर सोडण्यास भाग पाडू शकत नाही, असे केल्यास घरमालकावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. घरमालक अचानक घरात घुसून तपासणी करू शकत नाही. आता घरमालकाला आपले घर तपासणीपूर्वी 24 तास आधी भाडेकरूला सांगावे लागणार आहे. त्यामुळे भाडेकरूच्या गोपनीयतेचे रक्षण होणार आहे. तसेच भाडेकरूंची पोलिस पडताळणी करावी लागणार आहे.
चोवीस तासांत घरातील दुरुस्ती करावी लागणार
घरातील नळ, विद्युत बिघाड इत्यादी किरकोळ दुरुस्ती भाडेकरूने सुचविल्यास तीस दिवसांच्या आत घरमालकाला ही दुरुस्ती करावी लागणार आहे. घरमालकाने दुरुस्ती न केल्यास भाडेकरू स्वतः किरकोळ दुरुस्ती करून घेऊ शकतो. त्याचे पैसे भाड्यातून कमी करू शकतो.
घरमालकाला काय संरक्षण मिळणार ?
कायदेशीर करार केल्यामुळे घरमालकाला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. भाडेकरूने भाडेकराराचा भंग केल्यास न्यायाधिकरण किंवा छोट्या शहरात संबंधित प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. या तक्रारीवर प्रशासनाने 60 दिवसांत आत निर्णय घ्यायचा आहे. नवीन नियमात वेळेचे बंधन घातल्यामुळे घरमालकाला वर्षांनी वर्षे दिवाणी न्यायालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तसेच डिजिटल भाडेकरारामुळे घरमालकांना जास्त काळ राहणारे भाडेकरू, बनवाट ओळखपत्रे आणि भाडे अटींवरील वाद यासारख्या समस्यांना तोंड देताना मदत होणार आहे.
भाडेकरू आणि घरमालकावर कोणत्या जबाबदाऱ्या?
2026 च्या नियमांनुसार भाडेकरू आणि घरमालक दोघांनीही 60 दिवसांच्या आता करार केला पाहिजे. त्याची ऑनलाइन नोंदणी झाली का याची खात्री करावे लागणार आहे. भाडेकरू ठेवताना त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देऊन पोलिस पडताळणी केली पाहिजे. नव्या नियमात घरमालक आणि भाडेकरू दोघांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हा नियम दोघांनी पाळणे आवश्यक आहे. अनेक शहरामध्ये हे नियमाच पाळले जात नाही.
