Arvind Inamdar, Vishwas Nangare-Patil, Mitesh Ghatte या ‘सांगलीकर’ अधिकाऱ्यांचा प्रशासनात डंका!

Arvind Inamdar, Vishwas Nangare-Patil, Mitesh Ghatte या ‘सांगलीकर’ अधिकाऱ्यांचा प्रशासनात डंका!

पोलीस महासंचालक स्व. अरविंद इनामदार (Arvind Inamdar), आयएएस (IAS) नानासाहेब पाटील (Nanasaheb Patil) व विलासराव पाटील (Vilasrao Patil), आयपीएस (IPS) विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangare-Patil) आणि आनंद पाटील (Anand Patil) आणि पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Mittesh Ghatte) या सर्वांमध्ये काय साम्य आहे. तर हे सर्व एकाच सांगली जिल्ह्यातील आहेत. राज्यासह देश-परदेशात असे जवळपास सांगलीकर १५० पेक्षा अधिकारी आपल्या कर्तृत्वाचा डंका गाजवत आहे. नुकत्याच झालेल्या स्नेहसंमेलनानिमित्त एकत्र आलेल्या या सर्व अधिकाऱ्यांविषयी पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी हे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलेला लेख खास ‘लेट्सअप’च्या वाचकांसाठी…

घट्टे म्हणतात, राम राम देवा म्हणून साद घालणारे तडसरचे स्व. अरविंद इनामदार राज्याच्या पोलीस महासंचालक पदापर्यंत पोहोचले. तर कासेगावचे नानासाहेब पाटील व विलासराव पाटील या आयएएस बंधूंची राज्याच्या विकासाच्या अनेक धोरणात्मक निर्णयांत महत्वाची भूमिका ठरली. कोकरूडच्या विश्वास नांगरे-पाटील आणि आनंद पाटील यांच्या रुपांत एकाच वेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेतल्या यशाने येथील अनेक तरुणांच्या मनांत अधिकारी पदाच्या स्वप्नाने भुरळ घातली.

आज मोठ्या प्रमाणात सांगलीकर तरूण प्रशासनात दाखल होत आहेत. शिक्षणाच्या प्रवाहात त्यांचे मूळ गावापासून दूर जावे लागत असल्याने अनेकदा त्यांचा संदर्भ शोधणे अंमळ अवघड होते. अनेकदा एकाच विभागात काम करणारे सहकारी आपल्याच सांगली जिल्ह्यातील आहेत, याची पुसटशी कल्पनाही येत नाही. आपल्यातील औपचाररिकतेचे नाते गळून जावे यासाठी सांगलीकर अधिकार्‍यांना एका छताखाली आणण्यासाठी संजय पवार सर (अपर जिल्हाधिकारी) यांनी सांगली अधिकारी संघाची संकल्पना वास्तवात आणली. उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि संतोष पाटील यांनी पुढाकार घेत शनिवारी यूके (Uk) रिसॉर्टमध्ये सर्वांना एकत्रित केले. राज्याच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असलेल्या १५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी या स्नेहसंमेलनाला हजेरी लावली.

परस्परांची ओळख होण्यासाठी प्राथमिक प्रयत्न झाल्यानंतर आपला संघ आता पुढच्या प्रवासाला सज्ज झाला आहे. पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या वाटेवरच्या तरुणांना स्फूर्ती देत त्यांचे बोट धरून त्यांना प्रशासनाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. या तरुणांच्या उमेदवारीच्या काळातील नवखेपण दूर करण्यासाठी आपला अनुभव उपयोगी पडू शकेल. आपला सांगली जिल्हा वैविध्याने नटला आहे. अतिपर्जन्याचा शिराळा तालुका आणि कायमस्वरूपी दुष्काळी जत तालुका या जिल्ह्याच्या दोन टोकांतील अंतर विकास आणि समृद्धीतील तफावत दर्शवित असतो. त्यामुळे ही तफावत दूर करण्यासाठी आपला पुढाकार व सहभाग तसेच प्रशासनातील विविध विकासांच्या योजना प्रत्यक्ष गावच्या वेशीपर्यंत पोहचण्यासाठी निश्चित फलदायी होऊ शकतो. कृष्णाकाठच्या मातीशी असणारी नाळ आणि समाजाशी असणारे ऋणानुबंध जपण्यासाठी आपण सांगली अधिकारी संघाच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करु शकतो.

आपली पुढची पिढी आयुष्याच्या मळलेल्या वाटेने न जाता नविन पाऊलवाटा शोधत आहेत. अनेकजण त्यांत यशस्वी पण झाले आहेत. त्याचा लाभ आपल्या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना करियरच्या नवीन क्षेत्रांची ओळख होण्यासाठी होऊ शकतो. उद्योजक विकासाच्या वाटेवरचे मंत्र संतोष पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एकमेका करु सहाय्य, अवघे सारे बनू श्रीमंत याचं स्वप्न आता पुढच्या पिढीत पडायला हवे.

संतोष पाटील यांनी आपल्या सर्वांना आतापर्यंत चालू असलेल्या आभासी संवादातून प्रत्यक्ष भेटवले. अनेक माहितीचे चेहरे चांगल्या ओळखीचे बनले आहेत. आपल्यातील अनौपचारिक स्नेहाचे नाते सांगली जिल्ह्यच्या विकासाच्या स्वप्नाला सत्यात साकारण्यासाठी खतपाणी घालणारे ठरावे. सर्व सांगलीकर सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube