वारकऱ्यांच्या सेवेत आमदार विवेक कोल्हे; चरणसेवा, औषध वाटप आणि पावसाळी साहित्यांचे वितरण
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आमदार विवेक कोल्हेंनी वारकऱ्यांच्या पायांची तेलाने मालिश केली.
MLA Vivek Kolhe at the service of Warkaris: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आमदार विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेत विविध उपक्रम राबवले. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या गजरात मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांची त्यांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या पायांना औषधी तेलाने मालिश करत त्यांंची चरणसेवा केली.
पंढरपूरच्या दिशेने अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करत असताना वारकऱ्यांना होणारा शारीरिक थकवा, पायांची सूज आणि वेदना लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार कोल्हे यांनी वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेल लावून मालिश केली तसेच त्यांच्याशी संवाद साधत प्रवासातील अडचणी जाणून घेतल्या.
किराणा, कपडे अन् मोबाईल, लोकांचा पैसा नेमका कुठे खर्च होतो? केंद्र सरकार करणार मोठा सर्व्हे
यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्यसेवाही उपलब्ध करून देण्यात आली. प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाच्या सहकार्याने वारकऱ्यांना मोफत औषधे व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी घोंगट्यांचेही वितरण करण्यात आले.
वारकऱ्यांशी संवाद साधताना आमदार विवेक कोल्हे यांनी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याची वारी सुखरूप पार पडावी, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. तसेच वारीतून समता, बंधुभाव, शिस्त आणि सेवाभावाचे संस्कार समाजाला मिळतात, असेही त्यांनी नमूद केले.
वारी आणि माझं नात अजून घट्ट झाल, पहिल्यांदा अल्बम साँग आणि ते सुद्धा विठ्ठलाच – रिंकू राजगुरू !
संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही अनेक युवा स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेत वारकऱ्यांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामुळे वारकरी आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून समाजात सेवाभाव आणि माणुसकीची जपणूक करणारा हा उपक्रम असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.