मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघातात दोघींचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघातात दोघींचा मृत्यू

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळ मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये स्कुटी आणि रिक्षाचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. या भीषण अपघातात शहापूर तालुक्यातील कवडास येथील तरुणी अश्विनी गोळे हीचा जागीच मृत्यू झालाय. तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रिक्षामधील आणखी तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

याच महागार्गावर यापूर्वीही गंगा देवस्थान जवळील ब्रिजवर तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला होता. या थरारक अपघातात दोघेजण जखमी झाले होते. आधी भरधाव कंटेनर पलटी झाला, त्याला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि मग आयशर टेंपो येऊनही धडकला होता. नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने एक कंटेनर जात होता. त्यावेळी चालकाचा ताबा सुटून कंटेनर साधारण 200 फूट अंतरावरुन घसरत आला आणि दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन ब्रीजच्या वर धडकून पलटला होता. त्यामुळे कंटेनरचे पुढील दोन्ही व्हील तुटून ब्रीजच्या मधोमध असलेल्या गॅपमधून खाली पडले होते.

गंगा देवस्थान येथे रोज दर्शनासाठी अनेक भाविक जात असतात. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यावेळी कोणीही ब्रीजखाली नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. कटेंनर ब्रीजच्या वर जाऊन इतक्या जोरात पलटी झाला की, ब्रीजला खालच्या बाजूने मोठा तडा गेला होता. त्यानंतर त्या कंटेंनरला पाठीमागून येऊन दुसऱ्या कंटेनरने येऊन धडक दिली होती. त्याच्या पाठीमागे जात असलेल्या तिसऱ्या आयशर टेंपोचीही धडक बसली होती. असा हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात यापूर्वीही झाला होता. त्यामुळं या महामार्गावर होणाऱ्या अपघाताची नेमकी कारणं काय आहेत? याबाबत विचार करुन त्यावर कायमच्या उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube