तुळापूर रेव्ह पार्टीवर तेजस्विनी सातपुतेंचा मोठा खुलासा; 100 हून अधिक तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून परवानगीची वेळ संपल्यानंतरही पार्टी सुरू होती.
Tejaswini Satpute’s big revelation : पुण्यातील तुळापूर येथील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी मोठा खुलासा केला आहे. मध्यरात्री सुरू असलेल्या या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. परवानगीची वेळ संपल्यानंतरही पार्टी सुरू होती, मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळला आणि काही तरुण 21 वर्षांखालील असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तुळापूर परिसरातील आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर कारवाई केल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. सातपुते यांनी सांगितले की, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही पार्टी सुरू होती आणि त्यासाठी आवश्यक नियमांचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सातपुते यांच्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या कार्यक्रमाला दुपारी 1 वाजल्यापासून रात्री साडेअकरापर्यंतचीच परवानगी देण्यात आली होती. मात्र, परवानगीची मुदत संपल्यानंतरही पार्टी सुरू ठेवण्यात आली होती. याच कारणामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. छाप्यावेळी बंगल्यात 100 हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित होते. यातील काही जण 21 वर्षांखालील असल्याची शक्यता असून त्यांची कागदपत्रे आणि ओळख पडताळण्याचे काम सुरू असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले.
महागाई नियंत्रणात नाही, जनतेची लूट सुरू, एलपीजी दरवाढीवर शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
याशिवाय घटनास्थळावरून लाखो रुपयांचे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. या सर्व बाबींची तपासणी करून आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बंगला उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून त्याचा या पार्टीशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याचीही चौकशी सुरू असल्याचे सातपुते यांनी नमूद केले.
तसेच पार्टीत सहभागी झालेले तरुण कोणत्या भागांतून आले होते, त्यांना कोणी बोलावले होते आणि या संपूर्ण आयोजनामागे नेमके कोण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. रेव्ह पार्टी प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पोलिसांचा तपास आयोजक, बंगला मालक आणि पार्टीत सहभागी झालेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचला असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.