व्हीआयपींची गुप्त हजेरी, रात्रीच्या अंधारात भेटी; नाशिकमधील ‘तृप्तबाला’ बंगल्यामुळे खरात प्रकरणात खळबळ

लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर आरोपांनंतर, या बंगल्याच्या भिंतीआड लपलेले अनेक काळे धागे आता समोर येऊ लागले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 115

‘Truptbala’ bungalow creates stir in Kharat case : स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचे एकामागून एक थर आता उलगडत चालले आहेत. त्याच्याविरोधात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या एसआयटी चौकशीने वेग घेतला असून, तपासात धक्कादायक बाबी समोर येत आहेत. खरातचे कथित आध्यात्मिक कार्य केवळ कार्यालयापुरते मर्यादित नसून, त्याने उभारलेल्या कोट्यवधींच्या आलिशान तृप्तबाला बंगल्यात अनेक रहस्ये दडलेली असल्याचे उघड होत आहे.

नाशिकमधील उच्चभ्रू वस्तीत, जिथे तीन माजी आमदारांचे निवासस्थान आहे, त्याच परिसरात सुमारे 2012 च्या सुमारास खरातने 5 कोटींहून अधिक खर्च करून हा भव्य महाल उभारला. बाहेरून ऐश्वर्य आणि अध्यात्माचे आवरण असलेला हा बंगला, आत मात्र कथित गैरकृत्यांचा अड्डा बनल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर आरोपांनंतर, या बंगल्याच्या भिंतीआड लपलेले अनेक काळे धागे आता समोर येऊ लागले आहेत.

अमावास्येच्या रात्री रंगायचा गुप्त दरबार

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमावास्येच्या रात्री या बंगल्याचे स्वरूप पूर्णपणे बदलत असे. रात्रीच्या अंधारात येथे महागड्या आलिशान गाड्यांची वर्दळ वाढायची. राजकीय क्षेत्रातील काही बडे नेते, वरिष्ठ अधिकारी आणि आपली ओळख लपवू इच्छिणारे व्हीआयपी पाहुणे अधिकृत कार्यालयाऐवजी थेट या बंगल्यावर गुपचूप हजेरी लावत असत. या गुप्त दरबारात नेमके काय घडायचे, याबाबत आता शहरभर कुजबुज सुरू आहे.

दहशतीच्या छायेत उभारलेले साम्राज्य

खरातने केवळ भिंतींचे कुंपणच नव्हे, तर भीतीचे वातावरण निर्माण करून स्वतःभोवती एक अभेद्य कवच तयार केले होते. बंगल्याच्या परिसरात लाखो रुपये किमतीचे विदेशी जातीचे आक्रमक श्वान ठेवण्यात आले होते. त्यांच्या भीतीमुळे स्थानिक नागरिक या परिसरात फिरकायलाही घाबरत होते. या दहशतीमुळेच अनेक गोष्टी वर्षानुवर्षे दबक्या आवाजात राहिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एसआयटीकडून या सर्व बाबींची कसून चौकशी सुरू असून, बंगल्यातील घडामोडी, कथित व्हीआयपींची ये-जा आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता या तपासाकडे लागले आहे.

follow us