मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पारा घसरला
मुंबई : महानगरात यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. भारतीय हवामान विभागानुसार, मुंबईत आज सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं गेल्या आठवड्यामध्ये वर्तवलाय. त्यानुसार, मुंबईतील तापमानात कमालीची घट झाली आहे.
मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही घट झालेली पाहायला मिळाली. रविवारी कमाल तापमान 26.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यात आतापर्यंतचं सर्वात कमी तापमान 25 डिसेंबरला 15 अंश सेल्सिअस नोंदवलं होतं. त्यानंतर आज 13.8 अंश तापमानाची नोंद झालीय.
मुंबईची हवा आज दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीवर गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं हवा प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून येतंय. मुंबईच्या तापमानात घट झाल्यानंतर शहरातील हवा गुणवत्ता पातळी कमालीची खालवलीय. त्यामुळं आरोग्याच्या समस्या पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्या आहेत. मुंबईतील किमान तापमानात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंद बघायला मिळाली आहे.
मुंबईचं किमान तापमान 13.8 अंशांवर गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थितीवर गेल्याचं दिसून आलं. दिल्लीपेक्षाही जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचं सफरच्या नोंदीनुसार दिसून आलंय.