गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण
Share Market Crash- सेन्सेक्समध्ये (Sensex) तब्बल 2500 अंकांनी, तर निफ्टीमध्ये (Nifty) तब्बल 775 अंकांनी मोठी घसरण झालीय.
Share Market Crash : शेअर बाजारात (Share Market) गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात मोठी घसरण झालीय. सेन्सेक्समध्ये (Sensex) तब्बल 2500 अंकांनी, तर निफ्टीमध्ये (Nifty) तब्बल 775 अंकांनी मोठी घसरण झालीय. इराण-इस्रायल युद्धामुळे कच्चा तेलाची किंमती वाढल्या आहेत. त्यातच इराणच्या तेल साठ्यावर इस्रायलने क्षेपणास्त्र डागले आहेत. या तेल साठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमती आणखी भडकू शकतात. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारावर गुरुवारी परिणाम दिसून आला आहे. ही 21 महिन्यातील सर्वात मोठी घसरण आहे.
सेन्सेक्समध्ये गुरुवारी 2496 अंकांनी म्हणजे सव्वा तीन टक्के घसरण झाली आहे. तर निफ्टीमध्ये तब्बल 775 अंकांनी घसरण झालीय. त्यामुळे निफ्टी आता 23000 हजारावर आली आहे. 2923 कंपन्यांचे शेअर पडले आहेत.
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले
एचडीएफसी बँक, इटरनल आणि श्रीराम फायनान्स हे निफ्टीमधील सर्वाधिक कोसळणारे शेअर्स आहेत. ज्यात जवळपास पाच टक्क्यांची घसरण झाली. ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोल इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांच्या तेजीनंतर झालेली ही अचानक घसरण, बाजार अजूनही दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे.
गुंतवणूकदारांचे तब्बल 11.62 लाख कोटींचे नुकसान
बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आदल्या दिवशीच्या 439 लाख कोटींवरून घसरुण 427 लाख कोटींवर आले आहे. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात आले आहे. 11.62 लाख कोटींची घट झाली आहे.
शेअर बाजार कोसळण्याचे चार कारणे आहेत.
क्रूड ऑईलच्या वाढत्या किंमती
ब्रेंट क्रूड म्हणजेच कच्चा तेलाच्या किमतीत 3.77 टक्कांनी वाढल्या आहेत. आता किंमती प्रति बॅरल 111 डॉलरवर पोहोचल्या. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणतज्ज्ञ व्ही. के. विजयकुमार म्हणाले, ब्रेंट क्रूडची किंमती वाढणे ही भारतासारख्या तेल आणि वायू आयातदारांसाठी वाईट बातमी आहे. जर क्रूडची किंमत 110 डॉलरच्यावर राहिली, तर त्याचा भारतावर नकारात्मक परिणाम होईल.
परदेशी बाजारातील कमकुवत संकेत
18 मार्च रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली. या परिणाम 19 मार्च रोजी भारतासह आशियाई बाजारांवर जाणवला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि शांघाय एसएसई कंपोझिट या सर्वांमध्ये घसरण दिसून आली.
परदेशी गुंतवणूकदारांची विक्री
परदेशी गुंतवणूकदार (FII) भारतीय बाजारातून भांडवल काढून घेत आहे. सातत्याने विक्री करत असल्याने बाजारावरील दबाव वाढला आहे. याचा परिणाम रुपयावरही झाला असून, तो डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमकुवत झा आहे.
एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
19 मार्च रोजी बाजार उघडताच एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेले एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यामुळे या बँकेचे शेअर्स पाच टक्के घसरले आहे. त्यांनी 18 मार्च रोजी आपल्यापदाचा राजीनामा दिला होता. याचा परिणाम 19 मार्च रोजी शेअर्सवर दिसून आला. निफ्टी 50 आणि बँक निफ्टीमध्ये एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची महत्त्वपूर्ण भूमिका असतो.