लँडिंगदरम्यान तेजस Mk1A लढाऊ विमान क्रॅश, वैमानिक सुरक्षित, पण तेजसचे मोठे नुकसान

विमान अपघाताच्या प्राथमिक तपासणीत विमानातील ऑनबोर्ड प्रणालीतील बिघाडासह तांत्रिक अडचणीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 98

Tejas Mk1A fighter jet crashes during landing : भारतीय हवाई दलाचे आणखी एक तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट अपघातग्रस्त झाल्याने खळबळ उडाली असून संपूर्ण ताफ्यावर सखोल तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात महिन्याच्या सुरुवातीला एका महत्त्वाच्या एअरबेसवरील कार्यरत क्षेत्रात घडला. नियमित प्रशिक्षण उड्डाण पूर्ण करून स्वदेशी बनावटीचे हे लढाऊ विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जाते. प्राथमिक तपासणीत विमानातील ऑनबोर्ड प्रणालीतील बिघाडासह तांत्रिक अडचणीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने सुमारे 30 सिंगल-सीट तेजस विमानांचा संपूर्ण ताफा तात्पुरता ग्राउंड करून व्यापक तांत्रिक तपासणी सुरू केली आहे, अशी बातमी एका वृत्तसंस्थेने दिली आहे. अपघातग्रस्त विमानाचे एअरफ्रेम मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले असून ते ‘राइट-ऑफ’ करावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र वैमानिकाने वेळीच इजेक्शन केले आणि तो सुरक्षित बचावला असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

तेजस विमान सेवेत दाखल झाल्यानंतरचा हा तिसरा अपघात आहे. यापूर्वी मार्च 2024 मध्ये जैसलमेर जवळ पहिला अपघात झाला होता. फायरपॉवर डेमोन्स्ट्रेशनवरून परतताना हे विमान कोसळले होते; त्यावेळीही वैमानिकाने सुरक्षित इजेक्शन केले होते. दुसरा अपघात नोव्हेंबर 2025 मध्ये दुबई एअर शो दरम्यान एरोबॅटिक प्रदर्शन करताना घडला होता. त्या दुर्घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला होता आणि त्या अपघाताची चौकशी अद्याप सुरू आहे.

दरम्यान, तेजस Mk1A कार्यक्रमालाही विलंबाचा फटका बसला आहे. भारतीय हवाई दलाने 180 Mk1A लढाऊ विमानांची ऑर्डर दिली असतानाही वितरण जवळपास दोन वर्षे उशिराने होत आहे. Mk1A हे सध्या सेवेत असलेल्या तेजस विमानांचे सुधारित आणि अधिक क्षमतायुक्त मॉडेल आहे. या ताज्या अपघाताबाबत भारतीय हवाई दलाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

follow us