घेतले खोके, भूखंड ओके; मुख्यमंत्र्यांवर विरोधकांचा पुन्हा हल्ला

  • Written By: Published:
घेतले खोके, भूखंड ओके; मुख्यमंत्र्यांवर विरोधकांचा पुन्हा हल्ला

नागपूरः ८३ कोटींचा भूखंडावरून मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी मंगळवारी घेरले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी मुख्यमंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेत. आज विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरत सरकार, मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार, अश्या घोषणाही देण्यात आल्यात.

83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना देणे म्हणजे मंत्रिपदाचा दुरुपयोग तत्कालीन नगरविकास मंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. त्यावरून विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. त्यानंतर बुधवारीही विरोधक आक्रमक झाले आहेत. बुधवारी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय… मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणार्‍या राज्यपालाला हटवा.. ईडी सरकार हाय हाय…स्थगिती सरकार हाय हाय…अशा जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या. त्यांच्या हातामध्ये घोषणांचे बॅनर्स होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी सलग तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचे पहायला मिळाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube