पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या; एलॉन मस्कच्या पोलवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

  • Written By: Last Updated:

नागपूरः महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सीमावादाचा प्रश्न चिघळत आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फेक अकाउंटवरून ट्वीट केल्यामुळे तणाव निर्माण होत असल्याचे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीमावादात ट्वीटरच्या मालकालाही ओढले आहे. जयंत पाटील यांनी मस्क यांना केलेल्या ट्वीटची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्वीटर अकाउंटवरून सीमाप्रश्नावर अनेक ट्वीट करण्यात आलेले आहेत. या ट्वीटमध्ये सीमाप्रश्नाचा वाद उफाळून आला आहे. बोम्मई यांचे व्हॅरिफाइड ट्वीटर अकाउंट आहे. त्यावरून वादग्रस्त ट्वीट ही हटविण्यात आलेले नाही. या ट्वीटवरून राजकारण पेटले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची बैठक झाली. या बैठकीत सीमाप्रश्नावर चर्चा झाली. दोन्ही राज्यातील वाद मिटविण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले. पण त्यात बोम्मई यांचे फेक ट्वीट अकाउंट असल्याचे समोर आले. खुद्द गृहमंत्री अमित शाह यांनीच ही माहिती दिली.

त्यावरून महाराष्ट्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. बोम्मईच्या नावाने फेक अकाउंट काढणाऱ्यांना, तेढ निर्माण करणाऱ्याला शोधावे, अशी मागणीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता ट्वीटरच्या मालकाला यात ओढले आहे.

ट्वीटरचे मालक एलॉन मस्क यांनी आज एक ट्वीट केले. मी ट्वीटरचा प्रमुख म्हणून पायउतार व्हावे का, असे मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच पोलही घेतला आहे. त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayant Patil

Jayant Patil

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलॉन मस्क, आपण ट्वीटरच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्यापूर्वी याचा काय तो नक्की निकाल द्या हे ट्वीट नक्की कोणी केले आहे?, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. या ट्वीटची चर्चा आता जोरदार होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube