पुणे : गेल्या दीड वर्षांपासून शिरूर तालुक्याला तहसीलदार मिळत नाही. मिळाला तरी चार-सहा महिन्यांत त्याची बदली केली जाते. शिरूर तालुक्यातील जनतेची शेतीशी संबंधित आणि इतर सर्वच कामे खोळंबत आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ‘कुणी तहसीलदार देता का तहसीलदार, असे म्हणत शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी आज विधानसभेत टाहो फोडला.
अशोक पवार म्हणाले की, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सभागृहात उपस्थित आहेत. माझ्या शिरूर तालुक्याला तहसीलदार मिळत नाही. कोणी तहसीलदार आला की चार महिने राहतो. दुसरा येतो तोही चार महिने राहतो. गेल्या १८ महिन्यांतील ही स्थिती आहे. आम्हाला कसा न्याय मिळणार आहे. त्यामुळे महसूलमंत्री महोदय आम्हाला तहसीलदार नावाची गोष्ट मिळणार आहे की नाही, हे तरी सांगा.
दुसरी महत्वाची बाब माझ्या मतदार संघातील हवेली तालुक्याची लोकसंख्या ३५ लाख आहे. त्याठिकाणी आणखी एका तहसीलदाराची मंजुरी देण्यात आली आहे. हवेली पूर्वसाठी एक आणि हवेली पश्चिमसाठी एक तहसीलदार असे मंजूर असताना दुसरा तहसीलदार दिला जात नाही. ३५ लाख लोकांची कामे खोळंबत आहेत. त्यामुळे शिरूर तालुका आणि हवेली तालुक्यासाठी तहसीलदार तातडीने द्यावा, अशी मागणी अशोक पवार यांनी केली. त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमच्या मागणीची तातडीने दखल घेऊन कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
अशोक पवार म्हणाले की, महाराष्ट्राला भूषण असलेले तुळापूर आणि वढू बुद्रुकला छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे स्मारक आपण मंजूर केलेले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी २७० कोटी रुपयांची तरतूद केली. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी सांगताना जवळपास ४०० कोटी रुपयांचा उल्लेख केला आहे. हे स्मारक म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार असल्यामुळे त्याला ४०० कोटी रुपये दिलं तर नक्कीच तुम्हाला लोकांची दुवा मिळेल.
माझ्या मतदारसंघांतील विठ्ठलवाडी-सांगवी सांडस या ठिकाणी भीमा नदीवर पुलाची फार गरज आहे. त्यासाठी निधी मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करूनही मिळत नाही, अशी खंत व्यक्त करत अशोक पवार म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागच्या वेळेला वाघोली ते शिरूर जवळपास साडेसात हजार कोटींचा दोन मजली पूल मंजूर केला आहे. त्यामुळे ही कामे जलद गतीने व्हावी. कारण, पुणे अहमदनगर रस्त्यावर दररोज एक लाख वाहनांची वाहतूक होते. या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांबरोबर स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.