गोव्यात 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ, 86 देशांतील 150 हून अधिक चित्रपटांची मेजवानी
विविध देशांतील चित्रपट, कलाकार आणि चित्रपटप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणणारा हा महोत्सव पुढील नऊ दिवस रंगणार आहे.
57th International Film Festival kicks off in grand style in Goa : गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा म्हणजेच इफ्फीचा दिमाखदार शुभारंभ झाला. यंदा ‘सीमाविरहित कथा’ ही संकल्पना घेऊन हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 86 देशांतील 150 हून अधिक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विविध देशांतील चित्रपट, कलाकार आणि चित्रपटप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणणारा हा महोत्सव पुढील नऊ दिवस रंगणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अभिनेते आणि खासदार रवी किशन, तसेच महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याला चित्रपट निर्मितीचे मोठे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले. चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणासाठी परवानगी, आर्थिक मदत आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. भविष्यात गोव्यात चित्रपट निर्मितीपासून ते चित्रपट पूर्ण होण्यापर्यंतच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
अभिनेते रवी किशन यांनीही चित्रपटांच्या माध्यमातून भाषा आणि देशांच्या सीमा ओलांडून लोक एकमेकांशी जोडले जात असल्याचे सांगितले. तर आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपट हे वेगवेगळ्या संस्कृती आणि माणसांना जोडणारे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. यंदाच्या महोत्सवात स्पेन हा सन्माननीय देश, तर रशिया हा भागीदार देश म्हणून सहभागी झाला आहे.
तीन वर्षे शेतजमीन पडीक ठेवल्यास सरकारच्या ताब्यात जाणार? महसूलमंत्री बावनकुळेंचे महत्त्वाचे विधान!
भारतीय पॅनोरमा विभागात 18 भाषांमधील 76 चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय 52 महिला चित्रपट निर्मात्या आणि 62 नवोदित दिग्दर्शकांच्या कामांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आणि चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर संधी मिळवून देणाऱ्या वेव्हज् फिल्म बझारला यंदा 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमात 40 हून अधिक देशांतील 2 हजार 500 पेक्षा जास्त चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होत आहेत. चित्रपट निर्मिती, आर्थिक मदत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला यामुळे चालना मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्यात संगीत आणि नृत्याच्या खास कार्यक्रमांनीही रंगत आणली. तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेले संगीतकार रिकी केज यांच्या नेतृत्वाखाली विशेष संगीत सादरीकरण करण्यात आले. याशिवाय ‘म्युझिक विदाऊट बॉर्डर्स’ या कार्यक्रमातून विविध देशांतील संगीत परंपरांचा संगम पाहायला मिळाला. अशा प्रकारे चित्रपट, संगीत आणि विविध संस्कृतींच्या संगमातून 57 व्या इफ्फी महोत्सवाची सुरुवात दिमाखात झाली आहे.