थिएटरनंतर आता ‘सितारे जमीन पर’ झळकणार यूट्यूबवर; आमिर खानचा क्रांतिकारी निर्णय

Aamir Khan : सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू केलं आहे. थिएटरमध्ये प्रचंड यश मिळवलेला त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सितारे जमीन पर’ (Sitare Zameen Par) आता 1 ऑगस्ट 2025 पासून यूट्यूबवर Movies-on-Demand स्वरूपात जगभरात प्रदर्शित होणार आहे. भारतातील प्रेक्षकांना केवळ 100 रुपयांमध्ये हा चित्रपट पाहता येईल, तर अमेरिका, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपाइन्स आणि स्पेनसह 38 देशांमध्ये हा स्थानिक किंमतींमध्ये उपलब्ध असेल.
2007 मध्ये आलेल्या आणि समीक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा हा एकप्रकारे स्पिरिच्युअल सिक्वल असून त्यात आमिर खान, जेनेलिया देशमुख आणि बौद्धिक अपंगत्व असलेल्या 10 कलाकारांनी अभिनय केला आहे. प्रेम, हास्य आणि समावेशाचा उत्सव हा चित्रपट साजरा करतो. थिएटरमध्ये आधीच 250 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाची यूट्यूब रिलीज म्हणजे घरबसल्या सिनेमा पाहण्याचा एक परवडणारा आणि सहज मार्ग. प्रेक्षक मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपवर कुठेही आणि कधीही हा चित्रपट पाहू शकतील फक्त इंटरनेट कनेक्शन असावं लागेल. यासोबतच विविध प्रादेशिक भाषांमध्ये सबटायटल्स आणि डबिंगची सुविधाही दिली जाणार आहे, जेणेकरून हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेल.
आमिर खान म्हणाले की, “गेल्या 15 वर्षांपासून माझ्या मनात एकच प्रश्न होता जे प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत सिनेमा कसा पोहोचवायचा? आज यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्स, UPI आणि इंटरनेटमुळे हे शक्य झालं आहे. हे माझं स्वप्न होतं सर्वांपर्यंत सिनेमा योग्य किंमतीत पोहोचवणं. आज ते पूर्ण होतंय.” असं आमिर खान म्हणाले.
तर यूट्यूब इंडियाच्या कंट्री डायरेक्टर गुंजन सोनी म्हणाल्या, “‘सितारे जमीन पर’ यूट्यूबवर येणं ही केवळ एक डिजिटल रिलीज नाही, तर भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. यूट्यूब निर्माता आणि प्रेक्षक यांना थेट जोडणारा प्लॅटफॉर्म आहे. आम्हाला या भागीदारीचा अभिमान आहे.”
आज यूट्यूब हा केवळ टीझर, ट्रेलर किंवा गाण्यांचा नव्हे, तर पूर्ण सिनेमाचा अनुभव देणारा महत्त्वाचा माध्यम झाला आहे. विशेषतः भारतात Connected TV (CTV) चा वापर वेगाने वाढत असून प्रेक्षक मोबाईलसोबत स्मार्ट टीव्हीवरही प्रीमियम कंटेंट पाहत आहेत.
कॉमस्कोरच्या अहवालानुसार, 2024 मध्ये भारतातील 18 वर्षांवरील 80% लोकांनी यूट्यूब वापरले. यूट्यूबवर दररोज 7.5 अब्ज मनोरंजनाशी संबंधित व्हिडिओज पाहिले जातात. त्यामुळे या व्यासपीठावर ‘सितारे जमीन पर’ प्रदर्शित होणं ही एक दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी पायरी ठरणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केलं असून, कथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे.
सराईत गुंडाचा माज, मुलाच्या मित्रांना बेदम चोपलं, राजकीय कनेक्शन समोर
आमिर खान सध्या दोन मोठ्या चित्रपटांची निर्मिती करत आहे: लाहौर 1947 ज्यामध्ये सनी देओल आणि प्रीती झिंटा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर एक दिन या चिटपटामध्ये जुनैद खान आणि साई पल्लवी प्रमुख भूमिकेत असून हे दोन्ही चित्रपट ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली तयार होत आहेत.