मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’, ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ मधील भावस्पर्शी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
Daav Modu Nako : सध्या झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा
Daav Modu Nako : सध्या झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा ट्रेलर, गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यापूर्वी या चित्रपटातील ‘दिवस तुझे हे’ हे जुने गाणे नव्या स्वरूपात संगीतप्रेमींच्या भेटीस आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. जुन्या आठवणींना नवा ताजेपणा देत ‘डाव मोडू नको’ हे गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्यात घरातील वाढलेला कौटुंबिक तणाव प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. घरातील सदस्यांमधील गैरसमज, रुसवे-फुगवे आणि मनातील अव्यक्त भावना या गाण्यात पाहायला मिळते. गाण्यातील प्रत्येक फ्रेम नात्यांमधील न बोललेल्या भावनांची कथा सांगते, जी आज अनेक कुटुंबांना आपलीशी वाटू शकते.
‘डाव मोडू नको’ या गाण्याचे मूळ गायक सुधीर फडके (Sudhir Phadke) असून त्याला राम फाटक यांचे अजरामर संगीत लाभले होते. आता या गाण्याला नवसंजीवनी मिळाली असून, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांनी ते आपल्या खास शैलीत सादर केले आहे. या रिक्रिएटेड व्हर्जनला कुणाल करण यांचे साजेसे, आधुनिक तरीही मूळ आत्मा जपणारे संगीत लाभले आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “ ‘डाव मोडू नको’ हे केवळ गाणं नाही, तर प्रत्येक घरात कधी ना कधी निर्माण होणाऱ्या नात्यांतील तणावाचं प्रतिबिंब आहे. संवाद थांबला की नात्यांमध्ये अंतर वाढतं, आणि हेच वास्तव आम्ही या गाण्यात मांडलं आहे. आजच्या काळातील कुटुंबांमधील बदलतं नातेसंबंधाचं चित्र या नव्या सादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
मुंबई कल्याण महापालिका निवडणूक बोटावरची शाई पुसली, बोगस मतदानाचा धोका वाढला; विरोधक आक्रमक
झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या 16 जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
