‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या शेवटावर प्रेक्षकांमध्ये चर्चा; दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणाले, “ही मोठी जबाबदारी होती”
गेल्या 11 वर्षांपासून कायद्याला गुंगारा देणाऱ्या विजय साळगावकरची कथा आता ‘दृश्यम द कन्क्लूजन’ मधून अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे.
Audiences discuss the ending of ‘Drishyam: The Conclusion’ : विजय साळगावकरने आपली अखेरची चाल खेळली आहे आणि त्याच्या या निर्णयाने प्रेक्षकांना अक्षरशः आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्या 11 वर्षांपासून कायद्याला गुंगारा देणाऱ्या विजय साळगावकरची कथा आता ‘दृश्यम द कन्क्लूजन’ मधून अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. बहुप्रतीक्षित या चित्रपटाच्या शेवटाने प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून, थरारक कथानक आणि खिळवून ठेवणाऱ्या क्लायमॅक्सचं सर्वत्र कौतुक होत आहे.
चित्रपटाला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी या फ्रँचायझीचा शेवट मोठ्या पडद्यावर आणताना आलेल्या जबाबदारीबद्दल भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘दृश्यम द कन्क्लूजन’ बनवणं ही खूप मोठी जबाबदारी होती. प्रेक्षक अनेक वर्षांपासून या कथेशी आणि या पात्रांशी जोडले गेले आहेत. प्रत्येकाच्या मनात या कथेला कसा शेवट मिळावा याबाबत वेगवेगळे अंदाज, अपेक्षा आणि कल्पना होत्या. त्यामुळे या प्रवासाचा आदर राखत, त्याचवेळी प्रेक्षकांना अनपेक्षित अनुभव देणं हे आमच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं.
चित्रपटाच्या शेवटाबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल समाधान व्यक्त करताना अभिषेक पाठक म्हणाले, “प्रेक्षक चित्रपट अनुभवत आहेत, शेवटावर चर्चा करत आहेत आणि विजयने नेमकं काय केलं यावर आपापली मतं मांडत आहेत, हे पाहून खूप समाधान वाटतं. माझ्यासाठी ‘दृश्यम’ ही नेहमीच सत्याकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांची कथा राहिली आहे. चित्रपट पाहिल्यानंतरही लोक त्याचा अर्थ शोधत आहेत, चर्चा करत आहेत, हीच या फ्रँचायझीची खरी ताकद आहे.”
शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत! पाकिस्तानला अखेरच्या चेंडूवर धक्का; भारतानं जिंकलं आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक
देशभरातील प्रेक्षक आजही ‘दृश्यम’च्या विश्वाशी इतके भावनिकरीत्या जोडले गेले आहेत, याचं आश्चर्यही त्यांनी व्यक्त केलं. “लोक केवळ विजय साळगावकरशीच नव्हे, तर ‘दृश्यम’च्या संपूर्ण विश्वाशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत. अनेक वर्षांनंतरही ही पात्रं लोकांच्या आयुष्याचा एक भाग बनली आहेत. एक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही चित्रपटाचा शेवट त्यांच्या मनात कायम राहतो, यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच असू शकत नाही,” असं ते म्हणाले.
अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम द कन्क्लूजन’मध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, जयदीप अहलावत, प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांच्यासह दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळते. ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या या अंतिम अध्यायाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली असून, चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्टार स्टुडिओ18 प्रस्तुत आणि पॅनोरमा स्टुडिओज निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा अभिषेक पाठक, आमिल कियान खान आणि परवेज शेख यांनी लिहिली आहे. आलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, ‘दृश्यम द कन्क्लूजन’ सध्या चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत आहे.