आयपीएसचं अपूर्ण स्वप्न, पण रंगभूमीवर यशस्वी वाटचाल; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’तून दाभोळकरांची नवी झेप
दाभोलकर सांगतात, इंग्रजी भाषेत अनेक प्रयोग करताना त्यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची एक वेगळी पद्धत विकसित केली.
Dabholkar’s new leap with ‘Carry On Spygiri’ : इंग्रजी रंगभूमीवर आपल्या वेगळ्या शैलीत प्रयोग करणारे लेखक-दिग्दर्शक भरत दाभोळकर आता मराठी रंगभूमीवर एक नवा प्रयोग घेऊन येत आहेत. कॅरी ऑन स्पायगिरी हे लोकप्रिय इंग्रेजी नाटकं प्रथमच मराठीत सादर होणार असून, यानिमित्ताने त्यांनी लेट्सअप मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या कलाप्रवासाबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.
दाभोलकर सांगतात, इंग्रजी भाषेत अनेक प्रयोग करताना त्यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याची एक वेगळी पद्धत विकसित केली. मी इंग्रजी नाटकांमध्ये भांगडा कव्वालीसारखे प्रयोग केले. प्रत्येक शोच्या शेवटी इंग्रजीत उखाणे सांगायचो. मात्र, उखाणे ही संकल्पना परदेशी प्रेक्षकांना समजत नसल्याने ती उदाहरणांसह समजावून सांगावी लागायची, अशी आठवण त्यांनी सांगितली. त्या काळात देशाचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिम्हा राव होते, आणि ट्यान्कच्या संदर्भाने दिलेल्या उखाण्याने प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगात निर्माण झाली होती, असे देखील त्यांनी हसत सांगितले.
आजच्या नव्या पिढीबद्दल बोलताना दाभोलकर स्पष्टपणे म्हणाले, आपण सतत अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. मला माझ्या कामातून आनंद मिळतो, म्हणूनच मी अजून देखील काम करतो. त्यांनी तामिळ, हिंदी, भोजपुरी आणि मराठी अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केल्याचा उल्लेख केला. माझ्यासाठी भूमिकेचा आकार महत्वाचा नाही, तर त्या कामातून मिळणारा आनंद महत्वाचा आहे, असे ते म्हणाले.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील बदलांवर भाष्य करताना त्यांनी एक वास्तव मांडलं. आज एकाच दिवशी चार-चार मराठी चित्रपट प्रदर्शित होतात, तर दुसरीकडे एक मोठा हिंदी चित्रपट येतो. हिंदी चित्रपटांमध्ये ग्लॅमर आणि परदेशातील लोकेशन्स असल्याने प्रेक्षक त्याकडे आकर्षित होतात. पण नाटकांच्या बाबतीत मराठी रंगभूमी अजूनही मजबूत आहे आणि तिचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विनोदशैलीबद्दल बोलताना त्यांनी आर. के. लक्ष्मण आणि पु. ल. देशपांडे यांचा विशेष उल्लेख केला. टॉपिकल आणि शाब्दिक विनोद करणारे कलाकार मला खूप आवडतात, असे त्यांनी सांगितले. आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल बोलताना ते थोडे भावुक झाले. माझं स्वप्न आयपीएस अधिकारी होण्याचं होतं. ते पूर्ण करू शकलो नाही, याचं अजूनही वाईट वाटतं. आजही एखादा पोलीस अधिकारी भेटला की मनात विचार येतो, हे आपण करायला हवं होतं, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, त्यांनी एक वेगळीच गोष्ट उलगडली, मी दोन महिने जवानांसोबत राहून कच्छमधील जामनगर बॉर्डरवर नौदलाचं प्रशिक्षण घेतलं आहे. जर मी खरोखरच स्पाय झालो असतो, तर कदाचित खूप साधं नाव ठेवून काम केलं असतं, असे ते हसत म्हणाले. ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ या नाटकाबद्दल बोलताना त्यांनी प्रेक्षकांना आवर्जून आवाहन केलं, हे नाटक नक्की पाहा. नाहीतर तुम्ही एका उत्कृष्ट आणि वेगळ्या अनुभवाला मुकाल. मराठी रंगभूमीवर नव्या धाटणीचा, विनोद आणि प्रयोगशीलतेचा संगम घडवणारा हा प्रयत्न प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे, यात शंका नाही.