अमित त्रिवेदी यांच्या संगीतबद्ध ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ या गीताला सुखविंदर सिंह यांचा दमदार आवाज
कारगिल युद्धातील सर्वाधिक धाडसी आणि तुलनेने कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायांपैकी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर हे गीत साकारण्यात आले आहे.
‘Dilwale Dilsaaz Parinde’, composed by Amit Trivedi : 7 ऑगस्ट रोजी ‘ऑपरेशन सफेद सागर’च्या प्रीमियरपूर्वी नेटफ्लिक्सने टी-सीरिजच्या माध्यमातून ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ हे गीत प्रदर्शित केले आहे. या मालिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या भारतीय हवाई दलातील तरुण वैमानिकांच्या शौर्य, जिद्द आणि समर्पणाला वाहिलेली ही एक भावपूर्ण संगीतांजली आहे. कारगिल युद्धातील सर्वाधिक धाडसी आणि तुलनेने कमी चर्चिल्या गेलेल्या अध्यायांपैकी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर हे गीत साकारण्यात आले आहे. गणवेशामागील मानवी भावना, स्वप्ने, नाती आणि देशासाठी काहीही करण्याची तयारी असलेला निडर आत्मविश्वास यांचे प्रभावी चित्रण या गीतातून केले गेले आहे.
अमित त्रिवेदी यांनी या गीताचे संगीतबद्धीकरण आणि संयोजन केले असून, सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी आपल्या दमदार आवाजाने गीताला विशेष उंची दिली आहे. गीतकार सागर यांनी गीताचे बोल आणि रॅप लिहून सादर केला आहे. ‘दिलवाले दिलसाज परिंदे’मध्ये प्रेरणादायी धून आणि प्रभावी कथनशैलीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यांच्या प्रतिमेतून हे गीत त्या शूर वैमानिकांची कहाणी सांगते, ज्यांनी भीती आणि अनिश्चिततेवर मात करत देशसेवेच्या भावनेने आकाशात झेप घेतली.
या गीताचा संगीतचित्रफितीचा अनुभव प्रेक्षकांना थेट मालिकेच्या जगात घेऊन जातो. त्यामध्ये पात्रांमधील मैत्री, धैर्य, परस्परांवरील विश्वास आणि शांतपणे संकटांचा सामना करण्याची वृत्ती दाखवण्यात आली आहे. “दिलवाले दिलसाज परिंदे, हम अंबर के जांबाज परिंदे” या जोशपूर्ण ओळींसह दाखवण्यात आलेली दृश्ये कॉकपिटमधील आणि जमिनीवरील सहकाऱ्यांमधील दृढ बंध अधोरेखित करतात. अत्यंत आव्हानात्मक मोहिमेदरम्यान या तरुण स्क्वॉड्रनला एकत्र ठेवणाऱ्या बंधुत्वाची भावनिक झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.
काहींना भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले… आमदार खताळ यांचा थोरातांवर निशाणा
गीताविषयी बोलताना सुखविंदर सिंह म्हणाले, “ऑपरेशन सफेद सागरसारख्या कथेसाठी गाणे गाणे हा अत्यंत भावनिक अनुभव आहे. युद्धाचा व्यापक पट आणि आपल्या वैमानिकांचे शौर्य यामागे मैत्री, धाडस आणि त्यागाची अतिशय मानवी कहाणी दडलेली आहे. ‘दिलवाले दिलसाज परिंदे’ हे भारतीय हवाई दलातील त्या शूर वैमानिकांच्या जिद्दीचे प्रतिनिधित्व करते, ज्यांनी भीतीवर मात करून देशासाठी आकाशात झेप घेण्याचा निर्णय घेतला. अमित त्रिवेदी यांच्या अप्रतिम संगीतामुळे या गीताला भावनिक आणि संगीतात्मक विस्तार मिळाला आहे. तर सागर यांच्या गीतरचना आणि रॅपमुळे त्यात आधुनिकतेची ऊर्जा निर्माण झाली आहे. या गीताचा मुख्य उद्देश ‘गोल्डन अॅरोज’ला आदरांजली वाहणे हा आहे. हे गीत ऐकणाऱ्या प्रत्येकाला त्यामागील भावना जाणवतील आणि त्या शूर वैमानिकांच्या अद्वितीय धैर्याची आठवण करून देतील, अशी मला आशा आहे.”
शौर्य, जिद्द आणि त्यागाच्या या प्रेरणादायी कथेसह ‘ऑपरेशन सफेद सागर’ भारताच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाला उजाळा देते. जगातील सर्वाधिक उंचीवर पार पडलेल्या हवाई मोहिमांपैकी ही एक मोहीम होती. भारतीय हवाई दलातील सर्वांत तरुण स्क्वॉड्रनने ही जबाबदारी पार पाडत असामान्य धैर्याचे दर्शन घडवले होते. उच्च जोखमीच्या आणि अत्यंत थरारक अशा या लष्करी नाट्यमालिकेत त्या ऐतिहासिक मोहिमेची कथा उलगडली जाते, ज्याने व्यापक संघर्षाच्या दिशेवर परिणाम घडवला.
दिशाभूल झालेल्या मुलांना शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही; नीट आंदोलनावरील पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
या मालिकेचे दिग्दर्शन ओनी सेन यांनी केले असून अभिजीत सिंह परमार आणि कुशल श्रीवास्तव हे निर्माते आहेत. मॅचबॉक्स शॉट्स एलएलपीचे संजय रौत्रे आणि सरिता पाटील तसेच फील गुड फिल्म्सचे मेहबूब पाल सिंह बरार यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. मालिकेत सिद्धार्थ, जिमी शेरगिल, अभय वर्मा, दिया मिर्झा, प्राजक्ता कोळी, आदिल हुसेन, मिहिर आहुजा, तारुक रैना, अर्णव भसीन आणि अमृता बागची यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘दिलवाले दिलसाज परिंदे’ या गीताद्वारे ‘ऑपरेशन सफेद सागर’ची भावनिक कहाणी पडद्याच्या पलीकडे पोहोचते. ही केवळ एका असामान्य मोहिमेची कथा नसून त्या मोहिमेमागील खऱ्या नायकांना – त्यांच्या धैर्याला, मैत्रीला, स्वप्नांना आणि देशभक्तीच्या जाज्वल्य भावनेला वाहिलेली आदरांजली आहे. हे गीत सर्व प्रमुख संगीत मंचांवर उपलब्ध असून त्याचा संगीत व्हिडिओ टी-सीरिजच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे. ‘ऑपरेशन सफेद सागर’चा प्रीमियर 7 ऑगस्ट रोजी केवळ नेटफ्लिक्सवर होणार आहे.