‘दृश्यम’चा प्रभाव थांबता थांबेना! ‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या ट्रेलरला 24 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज
Drishyam The Conclusion ‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या ट्रेलरने 24 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत युट्युबवरही मोठा विक्रम केला आहे.
Drishyam The Conclusion: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीने पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या जगात प्रेक्षकांना खेचून आणलं आहे. ‘दृश्यम द कन्क्लूजन’च्या ट्रेलरने रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत युट्युब (YouTube) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 100 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि 5.5 लाखांहून अधिक एंगेजमेंट्स मिळवल्या आहेत. विशेष म्हणजे, हा ट्रेलर युट्युबवर तब्बल 6 तासांहून अधिक काळ #1 ट्रेंडिंगवर होता आणि अजूनही त्याची लोकप्रियता कायम आहे. त्यामुळे या बहुप्रतीक्षित अंतिम भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये किती उत्सुकता आहे, हे स्पष्ट होत आहे.
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘दृश्यम’चा हा बहुप्रतीक्षित शेवटचा अध्याय आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ट्रेलरमधील थरारक वातावरण, वाढलेला तणाव आणि विजय साळगावकरसमोर उभ्या राहणाऱ्या नव्या आव्हानांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील तीव्र संघर्ष हा ट्रेलरमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांपैकी बुद्धीच्या या खेळात अखेर बाजी कोण मारणार आणि शेवटची चाल कोण खेळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्या व्यक्तिरेखा विजय साळगावकरचा मार्ग रोखण्यासाठी सज्ज असल्याने यावेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे ‘दृश्यम’च्या या अंतिम खेळात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 2 ऑक्टोबरची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतशी ‘दृश्यम’च्या जगात पुन्हा एकदा प्रवेश करण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे.
अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम द कन्क्लूजन’मध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, जयदीप अहलावत, प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांच्यासह दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे.
‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, अभिनेत्री मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका
या बहुचर्चित फ्रँचायझीच्या अंतिम अध्यायासाठी या सर्व कलाकारांची भक्कम स्टारकास्ट एकत्र आली आहे. स्टार स्टुडिओ 18 प्रस्तुत आणि पॅनोरमा स्टुडिओज निर्मित ‘दृश्यम द कन्क्लूजन’चं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा अभिषेक पाठक, आमिल कीयन खान आणि परवेझ शेख यांनी लिहिली आहे. अलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘दृश्यम द कन्क्लूजन’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.