Maan : माणदेशच्या मातीत उलगडणार स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी प्रवास ; ‘मान’च्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा!
Maan : स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, जिद्द आणि सामूहिक सामर्थ्याची कहाणी मांडणाऱ्या ‘मान’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा
Maan : स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, जिद्द आणि सामूहिक सामर्थ्याची कहाणी मांडणाऱ्या ‘मान’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मोशन पोस्टरच्या माध्यमातून या कलाकृतीची घोषणा करण्यात आली होती. भेगाळलेल्या जमिनीवरून एकजुटीने पुढे सरसावणाऱ्या शेकडो स्त्रियांचे दृश्य त्यात पाहायला मिळाले होते. या अनोख्या मोशन पोस्टरने कथानकाविषयी उत्सुकता निर्माण केली होती. आता प्रत्यक्ष शूटिंगला प्रारंभ झाल्याने निर्मितीच्या पुढील टप्प्याला सुरुवात झाली आहे.
माणदेशच्या परिसरात चित्रीकरण सुरू असून, इथल्या मातीत रुजलेले स्त्रियांचे जगणे, त्यांच्या वाट्याला येणारी आव्हाने, कष्टातून आकाराला येणारी जिद्द आणि एकजुटीतून मिळणारे बळ अशा अनेक पैलूंचे चित्रण ‘मान’मध्ये केले जाणार आहे. विविध स्त्रियांच्या जीवनानुभवांतून त्यांच्या भावविश्वातील गुंतागुंत आणि सामूहिक परिवर्तनाची ताकद पडद्यावर साकारली जाणार आहे. माणदेशातील भौगोलिक रचना, तिथली संस्कृती आणि सामाजिक परिस्थिती कथेला वास्तवदर्शी अधिष्ठान देणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्माते आशुतोष गोवारीकर यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि गोवारीकर पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारत असलेल्या या प्रकल्पाची धुरा रोहन मापुस्कर सांभाळत आहेत. या तिन्ही संस्थांचा आणि दिग्दर्शकाचा पहिलाच एकत्रित प्रयत्न असल्याने ‘मान’कडे विशेष लक्ष लागले आहे.
अमित मेहता आणि आशुतोष गोवारीकर यांनी पटकथा लिहिली असून, संवादलेखनाची जबाबदारी अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज, सुनीता गोवारीकर आणि आशुतोष गोवारीकर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ‘मान’ ४ जून २०२७ रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.