आनंद कुमार यांच्या नव्या शैक्षणिक उपक्रमाने ऋतिक रोशन प्रभावित; ‘सुपर इन्फिनिटी’चे केले भरभरून कौतुक
Hrithik Roshan : बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन याने भारतातील आघाडीचे शिक्षक म्हणून ओळखले जाणारे आनंद कुमार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
Hrithik Roshan : बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन याने भारतातील आघाडीचे शिक्षक म्हणून ओळखले जाणारे आनंद कुमार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. आनंद कुमार यांनी सुरू केलेल्या ‘सुपर इन्फिनिटी’ या उपक्रमामुळे ऋतिक प्रभावित झाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने पोहोचवण्याचा आनंद कुमार यांचा प्रयत्न आहे. ऋतिकने ‘सुपर ३०’ या चरित्रपटात आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. त्यामुळे या शिक्षकासोबत त्याचे एक खास नाते आहे. याच पार्श्वभूमीवर ऋतिकने शिक्षण क्षेत्रातील आनंद कुमार यांच्या उल्लेखनीय योगदानाचे कौतुक केले आहे.
आनंद कुमार यांच्या या नव्या उपक्रमाच्या सुरुवातीबद्दल त्यांना शुभेच्छा देताना ऋतिकने सोशल मीडियावर लिहिले, “#SuperInfinity सोबत आणखी एका शानदार उपक्रमासाठी अभिनंदन, आनंद सर! अभ्यास इतका रंजक बनवणं फक्त तुम्हालाच शक्य आहे! @teacheranandkumar, तुम्हाला माझा सलाम. ” या मनापासून लिहिलेल्या संदेशातून ऋतिकने अभ्यास अधिक मनोरंजक बनवण्याच्या आनंद कुमार यांच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आकर्षक आणि सोपे करण्यासाठी आनंद कुमार सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांनाही त्याने दाद दिली आहे.
आनंद कुमार यांची भारतातील सर्वात प्रभावशाली शिक्षणतज्ज्ञांमध्ये गणना केली जाते. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना पद्मश्रीसारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगभरात ते त्यांच्या ‘सुपर ३०’ या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आनंद कुमार सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
View this post on Instagram
‘सुपर ३०’च्या माध्यमातून आनंद कुमार यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बॅचला कठीण मानली जाणारी आयआयटी-जेईई परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित केला आहे. आता ‘सुपर इन्फिनिटी’च्या माध्यमातून ते आपले हेच ध्येय अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेत आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक सोपे, रंजक आणि परिणामकारक बनवण्याच्या उद्देशाने ते नवनवीन मार्ग शोधत आहेत.
ऋतिकचा हा संदेश आनंद कुमार आणि त्यांच्या निःस्वार्थ कार्याप्रती असलेला आदर अधोरेखित करतो. ‘सुपर ३०’च्या माध्यमातून सुरू झालेल्या आपल्या शैक्षणिक प्रवासाचा विस्तार करताना आनंद कुमार आता ‘सुपर इन्फिनिटी’द्वारे अधिकाधिक तरुणांना प्रेरित करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहेत. पुढील पिढीला दर्जेदार शिक्षणाचा अनुभव अधिक चांगल्या पद्धतीने मिळावा, हेच या उपक्रमामागील त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.