MIFF 2026: अहिल्यानगरच्या मातेतील ‘हमसफर’ची मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड
Humsafar Short Film-उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असणारा हा लघुपट आहे.
Humsafar Short Film : अहिल्यानगरच्या हरहुन्नरी कलाकारांच्या योगदानातून तयार झालेला हमसफर लघुपट हा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF 2026) प्रदर्शित होणार आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असणारा हा लघुपट आहे. या लघुपटात मुख्य भूमिका अभिनेते विजय पाटकर यांची आहे. तर अभिजित दळवी यांनी लघुपट दिग्दर्शित केला आहे.
‘हमसफर’ या लघुपटाची मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव राष्ट्रीय स्पर्धा (National Competition)-शॉर्ट फिक्शन विभागासाठी अधिकृत निवड झाली आहे. ‘हमसफर’ची MIFF सारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवासाठी निवड होणे हा संपूर्ण टीमसाठी अत्यंत अभिमानाचा आणि संस्मरणीय क्षण आहे.
‘हमसफर’ हा लघुपट मानवी नात्यांतील त्या अदृश्य भावबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे, जिथे शब्द नसतानाही भावना स्वतःचा आवाज शोधतात. माणसा माणसांमधील निःशब्द संवाद आणि भावनिक नात्यांची ताकद या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
गोव्यात ‘हमसफर’चा डंका
गोव्यात IFFI मध्ये ‘हमसफर शॉर्ट फिल्म’चं स्क्रिनिंग पार पडले. तर लघुपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
लघूपट कधी प्रदर्शित होणार ?
हा लघूपट 19 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ऑडी 1, एफडी-एनएफडीसी कॉम्प्लेक्स, पेडर रोड, मुंबई येथे प्रदर्शित होणार आहे.
यावेळी चित्रप्रेमी आणि सिनेसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
19 निवडक मराठी माहितीपट आणि लघुपटांचे विशेष प्रदर्शन
यंदा महोत्सवासाठी 1459 चित्रपटांच्या नोंदी प्राप्त झाल्या. त्यापैकी स्पर्धा विभागात 144 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये 92 भारतीय आणि 52 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 202 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या विभागात 46 देशांतील चित्रपटांचा समावेश असून ‘बेस्ट ऑफ स्टिव्हल्स’, ‘ऑस्कर विजेते चित्रपट’, ‘रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘एनएफडीसी रिस्टोर्ड फिल्म्स’, ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ आदी विशेष पॅकेजेस सादर करण्यात येणार आहेत. 16 ते 20 जून दरम्यान दररोज सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत 19 निवडक मराठी माहितीपट आणि लघुपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य, ग्रामीण जीवन, वारसा आणि मानवी नातेसंबंध या विषयांवरील चित्रपटांचा यात समावेश आहे.