भारत जागतिक कंटेंट निर्मितीचे केंद्र बनतंय: डॉ. एल. मुरुगन, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन

MIFF 2026-आज भारत हा जागतिक स्तरावर सर्जनशीलतेचे शक्तिकेंद्र आणि विश्वासार्ह कंटेंट निर्मिती भागीदार म्हणून ओळखला जात आहे.

  • Written By: Published:
Miff 2026

MIFF 2026 : भारतातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीचा प्रतिष्ठेचा 19 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF 2026) सोमवारी दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात उत्साहात सुरू झाला. सिनेमातील उत्कृष्टता, सांस्कृतिक वैविध्य आणि सर्जनशीलतेचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन (Dr. L. Murugan) यांच्या हस्ते झाले.

यावेळी डॉ. मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील झपाट्याने होत असलेली प्रगती अधोरेखित केली. आज भारत हा जागतिक स्तरावर सर्जनशीलतेचे शक्तिकेंद्र आणि विश्वासार्ह कंटेंट निर्मिती भागीदार म्हणून ओळखला जात आहे. भारतीय कथा जगभरातील प्रेक्षकांना प्रेरणा देण्याची क्षमता ठेवतात आणि आपल्या देशातील सर्जनशील प्रतिभा जगात अतुलनीय आहे,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी IFFI 2026 चे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, NFDC चे अध्यक्ष कृष्णकुमार जी, MIFF चे महोत्सव संचालक व NFDC चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन (IDPA) चे अध्यक्ष संस्कार देसाई, तसेच चित्रपटसृष्टीतील मान्यवर, परीक्षक, निर्माते आणि देश-विदेशातील पाहुणे उपस्थित होते.


माध्यम मनोरंजन उद्योग 3 लाख 30 हजार कोटीपर्यंत जाणार

2025 मध्ये भारताच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाने 9 टक्के वाढ नोंदवत 2 लाख 78 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. डिजिटल माध्यमे प्रथमच 1 लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवून या उद्योगातील सर्वात मोठा घटक ठरला आहे. 2028 पर्यंत हा उद्योग 3 लाख 30 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून वार्षिक सात टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. तसेच 2025 मध्ये भारतात 1,900 हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यामुळे चित्रपटगृहांच्या महसुलात 16 टक्क्यांची वाढ झाली.

मुंबईला भारताची सर्जनशील राजधानी संबोधताना त्यांनी 2025 मध्ये मुंबईत झालेल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) चा उल्लेख केला. तसेच, MIFF सारखे महोत्सव भारताला जगातील आघाडीचे कंटेंट निर्मिती केंद्र बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. मुरुगन यांनी WAVES डॉक बाजार या व्यासपीठाचेही कौतुक केले. माहितीपट निर्माते, निर्माते, वितरक, उद्योगतज्ज्ञ आणि जागतिक प्रेक्षक यांना जोडणारे हे व्यासपीठ नवोदित आणि अनुभवी चित्रपट निर्मात्यांमधील दुवा बनले असून दर्जेदार माहितीपटांच्या निर्मिती आणि जागतिक वितरणाला चालना देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी उद्घाटन समारंभात जगभरातून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत केले. मुंबईत स्थापन होत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत त्यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने मुंबईत जागतिक दर्जाचे मीडिया हब उभारण्याचा मानस व्यक्त केला. तसेच 2025 मध्ये मुंबईत झालेल्या WAVES उपक्रमासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी MIFF हा मुक्त विचार, सर्जनशील अभिव्यक्ती आणि भारतीय संस्कृतीच्या उदात्त परंपरेचा उत्सव असल्याचे सांगितले. ऋग्वेदातील “आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः” या वचनाचा उल्लेख करत त्यांनी जगभरातील कल्पना, चित्रपट आणि सर्जनशील व्यक्तींना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणजे MIFF असल्याचे सांगितले. तसेच, हा महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘क्रिएट इन इंडिया’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.


जयदीप अहलावत यांचा विशेष सत्कार

समारंभातील प्रमुख आकर्षण म्हणजे अभिनेता जयदीप अहलावत यांचा भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल करण्यात आलेला सत्कार. डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वीकारताना जयदीप अहलावत यांनी कृतज्ञता व्यक्त करत MIFF सारखे महोत्सव मुख्य प्रवाहाबाहेरील आशयप्रधान चित्रपटांना आणि नव्या कथनशैलींना व्यासपीठ उपलब्ध करून देतात, असे सांगितले.

उद्घाटन चित्रपटांच्या टीमचा गौरव
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘Agapito’ या लघुपट आणि ‘Time & Water’ या माहितीपटाच्या कलाकार व निर्मात्यांचाही गौरव करण्यात आला. Agapito चित्रपटातील अभिनेता अँटोन नोलास्को आणि कास्टिंग डायरेक्टर मा. क्रिस्टिना सायमन यांचा सन्मान करण्यात आला. तसेच National Geographic आणि JioStar यांच्या ‘Time & Water’ माहितीपटाशी संबंधित टीमलाही गौरविण्यात आले.

परीक्षक मंडळाचे स्वागत
उद्घाटन सोहळ्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा आणि FIPRESCI परीक्षक मंडळातील सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. भारतासह विविध देशांतील चित्रपट निर्माते, समीक्षक, अभ्यासक आणि मीडिया तज्ज्ञ या परीक्षक मंडळात सहभागी झाले आहेत. समारंभात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आणि NFDC च्या सहकार्याने द्वैवार्षिक स्वरूपात आयोजित करण्यात येणारा हा सात दिवसांचा महोत्सव चित्रपट निर्माते, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमींसाठी समृद्ध अनुभव ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवात “मराठी फिल्म्स” आणि “एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट” या दोन नव्या विशेष विभागांचा समावेश करण्यात आला असून, प्रादेशिक चित्रपटसृष्टीला व्यासपीठ उपलब्ध करून भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचा गौरव करण्याचा त्यामागील उद्देश आहे.

follow us