‘मान’ मधून उमटणार स्त्रीशक्तीचा सामूहिक हुंकार; 4 जूनला चित्रपट होणार प्रदर्शित

Ashutosh Gowariker : काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून एका दिशेने

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Ashutosh Gowariker

Ashutosh Gowariker : काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून एका दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या शेकडो स्त्रिया आणि त्यांच्या पावलांमधून जाणवणारा संघर्षाचा प्रवास… अशाच एका वेधक दृश्यातून झी स्टुडिओजच्या आगामी ‘मान’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्माते आशुतोष गोवारीकर यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन मापुस्कर करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने त्याच्या आशयाची एक झलक दाखवतानाच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

पोस्टरमधील दृश्य केवळ लक्षवेधी नसून त्यामागे एक अर्थपूर्ण मांडणीही दडलेली आहे. यातून सामान्य स्त्रियांच्या आयुष्यातील कष्ट, जिद्द आणि परिस्थितीसमोर न झुकण्याची वृत्ती अधोरेखित होते. या स्त्रियांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या एकत्रित ताकदीकडे पाहाण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ‘मान’मधून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे मोशन पोस्टर सूचित करते.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील तीन महत्त्वाची नावं प्रथमच या निमित्ताने एकत्र आली आहेत. आशुतोष गोवारीकर यांची निर्माता म्हणून ही पहिलीच मराठी कलाकृती आहे. दर्जेदार, आशयपूर्ण चित्रपटांची परंपरा जपणारे झी स्टुडिओज आणि संवेदनशील विषय उत्कृष्टरित्या मांडणारे दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्यासोबत त्यांची ही पहिली निर्मिती आहे. त्यामुळे या तिघांच्या सहयोगातून मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळा आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

‘ मान ‘ चित्रपटाच्या घोषणेबद्दल बोलतांना निर्माते आशुतोष गोवारीकर म्हणाले की, ”चित्रपटाची निर्मिती करताना मला नेहमीच अशा कथांचा शोध असतो, ज्या मनोरंजनासोबतच विचार करायलाही भाग पाडतात. ‘मान’ची संकल्पना माझ्यापर्यंत आली, तेव्हा त्यातील विषयाने आणि त्याच्या व्याप्तीने मला विशेष आकर्षित केले. मराठी भाषेशी आणि संस्कृतीशी माझं नातं कायमच जिव्हाळ्याचं राहिलं आहे. त्यामुळे निर्माता म्हणून माझ्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी हा विषय निवडला जाणं माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे. झी स्टुडिओजसारख्या अनुभवी टीमसोबत ही कथा मोठ्या पडद्यावर आणण्याचा अनुभव निश्चितच खास आहे.”

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणाले की, ” अनेक स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारा हा चित्रपट आहे. या विषयाकडे पाहाताना त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा प्रवास, तिची धडपड आणि जगण्यातील बारकावे प्रामाणिकपणे पडद्यावर आणणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची दृश्यात्मक मांडणीही तितकीच वेगळी आणि व्यापक असणार आहे. आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या दिग्गज निर्मात्यांचा अनुभव आणि झी स्टुडिओजची साथ मिळणं ही माझ्यासाठी मोठी संधी आहे.”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, ”मराठी चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण विषय आणि सशक्त आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर आमचा नेहमीच भर असतो. ‘मान’ हे त्याच दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, आमच्यासाठीही आनंदाचा क्षण आहे. रोहन मापुस्कर यांचा दृष्टिकोन आणि आशुतोषजींचा निर्मितीचा अनुभव यांची सांगड या चित्रपटाला एक वेगळी ओळख देईल, असा आम्हाला विश्वास आहे.’’

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘मान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. झी स्टुडिओज आणि गोवारीकर पिक्चर्सची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते झी स्टुडिओज, सुनीता गोवारीकर आणि आशुतोष गोवारीकर आहेत. अमित मेहता आणि आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटाचे लेखन केले असून संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. सध्या कलाकारांबाबत गोपनीयता असलेला हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

follow us