‘मातृभूमि’चं नवीन गाणं ‘चांद देख लेना’; सलमान खानसोबत चित्रांगदा सिंहची शानदार केमिस्ट्री
Chand Dekh Lena-: सलमान खान यांनी पहिल्याच झलकित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता आपल्या चाहत्यांसाठी ईदचं खास गिफ्ट दिलं आहे.
Maatrubhumi: May War Rest In Peace : सलमान खान यांनी पहिल्याच झलकित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता आपल्या चाहत्यांसाठी ईदचं खास गिफ्ट दिलं आहे. सलमान खान (Salman Khan) फिल्म्सने ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ (Maatrubhumi: May War Rest In Peace) या चित्रपटातील सलमान खान आणि चित्रांगदा सिंह यांच्यावर चित्रित केलेलं “चांद देख लेना” (Chand Dekh Lena) हे पूर्ण गाणं रिलीज केलं आहे. ईदच्या शुभ मुहूर्तावर आलेलं हे गाणं चंद्राच्या भावनिक महत्त्वाला अत्यंत सुंदर पद्धतीने मांडतं आहे.
ईदमध्ये चंद्र दिसणं हे आनंद आणि भेटीचं प्रतीक असतं, तर करवा चौथमध्ये ते प्रेम, प्रतीक्षा आणि विश्वासाचं प्रतीक आहे. “चांद देख लेना” या दोन्ही परंपरांना भावनांच्या आणि आशेच्या धाग्यात गुंफतं. या चित्रपटातील टायटल ट्रॅक “मातृभूमि” ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्याला 50 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे निमित्त “मैं हूँ” हे गाणं आलं आणि आता “चांद देख लेना” मुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हिमेश रेशमिया यांच्या संगीताने सजलेलं हे गाणं जुन्या आणि खऱ्या प्रेमाची आठवण करून देतं. एका सैनिकाच्या कर्तव्य आणि त्याच्या नात्यांमधील भावनिक प्रवास या गाण्यात अत्यंत प्रभावीपणे दाखवला आहे. व्हिडिओमध्ये चित्रांगदा सिंह यांची भूमिका एका सैनिकाच्या पत्नीची आहे, जी सीमारेषेवर तैनात असलेल्या आपल्या पतीची (सलमान खान आतुरतेने वाट पाहते) हे गाणं देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबांच्या ताकदीला सलाम करतं. संगीताच्या दुनियेत काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने सलमान खान यांनी या गाण्यातून नव्या टॅलेंटला संधी दिली आहे. “चांद देख लेना” हे गाणं युवा गायक Nihal Tauro आणि Ankona Mukherjee यांनी गायलं आहे. भजन आणि कीर्तनासाठी ओळखल्या जाणाऱ्या या गायकांना मेनस्ट्रीम सिनेमात मोठी संधी देण्यात आली आहे.
पूर्वी या चित्रपटाचं नाव ‘बॅटल ऑफ गलवान’ होतं, मात्र आता ते बदलून ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ करण्यात आलं आहे. या बदलामागे युद्धाच्या पार्श्वभूमीवर मानवी भावना आणि संवेदनशीलतेचा संदेश अधिक ठळकपणे मांडण्याचा उद्देश आहे. मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली सलमान खान यांनी निर्मित केला असून अपूर्व लिखिया यांनी दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट शौर्य, त्याग आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा सादर करणार असून चित्रांगदा सिंह यांची भूमिकाही यात महत्त्वाची आहे.