अमेरिकेतील ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सवा’त मराठी कला-संस्कृतीचा जागर; रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव’

मराठी कलाकारांनी आपल्या पेहरावातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याची झलक हॉलिवूडनगरीत सादर केली.

News Photo   2026 08 09T211952.776

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६’चा शुभारंभ हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. यावेळी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान कलाप्रवासाबद्दल ‘नाफा जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या हस्ते रोहिणी हट्टंगडी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नाफाच्या को-कन्व्हेनर अर्चना सराफ, रिया ठोसर, ज्येष्ठ सभासद श्री. ठाणेदार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘भारताबाहेर मिळालेला हा पहिलाच पुरस्कार’

सन्मान स्वीकारताना रोहिणी हट्टंगडी यांनी हा पुरस्कार आपल्या संपूर्ण कलाप्रवासाला आकार देणाऱ्या आई-वडिलांसह गुरु इब्राहिम अल्काझी, पती जयदेव हट्टंगडी, सहकलाकार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आणि निर्मात्यांना समर्पित केला.

“मला अजून खूप काम करायचे आहे. ‘जीवन गौरव’ मिळाल्यानंतर घरी बसण्याचा माझा अजिबात विचार नाही. भारताबाहेर मिळालेला हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नाफाने आयोजित केलेल्या सोहळ्याबद्दल त्यांनी अभिजित घोलप आणि संपूर्ण नाफा टीमचे आभार मानले.

‘नाफा’ केवळ चित्रपट महोत्सव नव्हे, सांस्कृतिक व्यासपीठ

“नाफा हा केवळ रुपेरी पडद्याशी जोडलेला चित्रपट महोत्सव नसून अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरेचा जागर घडविणारे सांस्कृतिक व्यासपीठ आहे,” असे नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदापासून या उपक्रमाला अधिक बळ मिळाले असून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतन-संवर्धनाच्या या प्रवासात युवा पिढीही उत्साहाने सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी नाफा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावळकर तसेच अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांना प्रदान करण्यात आला आहे. याच परंपरेत रोहिणी हट्टंगडी यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा नाफासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे घोलप यांनी सांगितले.

रेड कार्पेटवर मराठी कलाकारांचा दिमाख

नाफाच्या रेड कार्पेटवर यंदा मराठी कलाकारांचा अनोखा ‘स्वॅग’ पाहायला मिळाला. पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेपासून आधुनिक भारतीय आणि पाश्चात्त्य पेहरावापर्यंत विविध शैलींचे दर्शन कलाकारांच्या उपस्थितीत झाले.

गिरीजा ओक, श्रुती मराठे, अर्चना जोगळेकर, सई देवधर आणि डॉ. गौरी घोलप यांच्या आकर्षक व देखण्या पेहरावाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महेश कोठारे, अभिजित घोलप आणि अजिंक्य देव यांनीही आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा पाश्चात्त्य वेशभूषेतून विशेष छाप पाडली.

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, तृप्ती भोईर, निर्माती मंजिरी ओक, नीलिमा कोठारे, अर्चना सराफ, रिया ठोसर आणि मानसी देवळेकर यांनी अभिजात अंदाजात उपस्थिती लावली. तर दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अतुल कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्या सहजसुंदर शैलीनेही रसिकांचे लक्ष वेधून घेतले. निर्माती गार्गी कुलकर्णी यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने रेड कार्पेटची शोभा वाढवली.

परंपरा, आधुनिकता, भारतीयत्व आणि जागतिक फॅशन यांचा सुरेख मिलाफ साधत मराठी कलाकारांनी आपल्या पेहरावातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याची झलक हॉलिवूडनगरीत सादर केली. कलाकारांच्या प्रत्येक प्रवेशाला उपस्थित मराठी रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कलाकारांचे छायाचित्र टिपण्यासाठी रसिकांमध्ये अक्षरशः उत्साहाची लाट उसळली होती.

‘गाला डिनर’मध्येही मान्यवरांची मांदियाळी

नाफाच्या प्रथेनुसार महोत्सवाच्या आदल्या दिवशी नाफाचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांच्या निवासस्थानी ‘गाला डिनर’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मराठी कलावंतांसह अमेरिकेतील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

सॅन होजे येथील कॅलिफोर्निया थिएटरमध्ये तीन दिवस रंगणाऱ्या नाफा महोत्सवाच्या पुढील दोन दिवसांत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शनपर आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच अनेक चित्रपट आणि लघुपटांचे जागतिक प्रथम प्रदर्शन तसेच विशेष प्रदर्शनही होणार आहेत.

हॉलिवूडनगरीत मराठी चित्रपटाचा झेंडा फडकवत मराठी भाषा, कला आणि संस्कृतीचा जागर घडविणारा ‘नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६’ हा जागतिक मराठी समुदायासाठी अभिमानाचा सोहळा ठरत आहे.

follow us