‘द ओडिसी’ : नोलनचं भव्य सिनेमॅटिक महाकाव्य; परतीच्या प्रवासातून आत्मशोधाची गाथा

काही कथा काळाच्या पलीकडे जगत राहतात. त्या एका संस्कृतीच्या, एका भाषेच्या किंवा एका पिढीच्या मर्यादेत अडकून राहत नाहीत.

  • Written By: Published:
WhatsApp Image 2026 07 17 At 12.06.14 PM

Nolan’s grand cinematic epic : द ओडिसी’ : परतीच्या प्रवासाचे ‘महाकाव्य…’
काही कथा काळाच्या पलीकडे जगत राहतात. त्या एका संस्कृतीच्या, एका भाषेच्या किंवा एका पिढीच्या मर्यादेत अडकून राहत नाहीत. त्या प्रत्येक काळात नव्याने जन्म घेतात, नव्याने अर्थ सांगतात आणि प्रत्येक पिढीला स्वतःकडे परत पाहायला भाग पाडतात. ग्रीक कवी होमर यांच्या ‘द ओडिसी’ या महाकाव्याचं स्थान असंच आहे.

सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या या महाकाव्याने असंख्य लेखक, चित्रकार, संगीतकार आणि चित्रपट दिग्दर्शकांना प्रेरणा दिली. पण या महाकाव्याला आधुनिक सिनेमाच्या भाषेत, त्याचं मूळ वैभव अबाधित राखत नव्याने पडद्यावर आणण्याचं धाडस फार थोड्या कलावंतानी केलं. हे आव्हान स्वीकारलं ते ख्रिस्तोफर नोलन यांनी.

‘द डार्क नाईट…’, ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’, ‘डंकर्क’ आणि ‘ओपेनहायमर’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना वेळ, स्मृती, विज्ञान आणि मानवी मनाच्या गुंतागुंतीच्या प्रवासावर नेणाऱ्या नोलन यांनी यावेळी प्राचीन कथेकडे वळत तिच्यातून सर्वात आधुनिक प्रश्न विचारले आहेत.

आणि म्हणूनच ‘द ओडिसी’ हा केवळ एक पौराणिक चित्रपट राहत नाही; तो नोलनच्या संपूर्ण कलात्मक प्रवासाचा आरसा बनतो…

घरी परतीची कथा, तरी प्रवासाची गाथा नाही…
ट्रॉयचं युद्ध संपलं आहे. विजय मिळाला आहे. तलवारी शांत झाल्या आहेत, पण प्रत्येक युद्धानंतर खरी लढाई सुरू होते ती सैनिकांच्या मनात…

ओडिसियस आपल्या राज्यात, आपल्या पत्नी पेनेलोपकडे आणि मुलगा टेलीमॅकसकडे परतण्यासाठी समुद्रमार्गे निघतो, मात्र हा प्रवास काही दिवसांचा नाही. तब्बल दहा वर्षे चालणारा हा संघर्ष आहे…

या प्रवासात त्याच्यासमोर सायक्लॉप्ससारखे राक्षस आहेत, सायरन्सचं मोहक आमिष आहे, समुद्रदेवतांचा कोप आहे, सर्कीचं मायाजाल आहे, हेडीसचा अंधार आहे आणि सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचाच अहंकार…

नोलन या प्रवासाकडे साहस म्हणून पाहत नाहीत; ते त्याकडे आत्मशोधाच्या यात्रेसारखं पाहतात.

कारण माणूस जेव्हा घरी परततो, तेव्हा तो पूर्वीचा राहिलेला नसतो.

नोलनच्या कारकिर्दीचा केंद्रबिंदू येथे गवसतो…
ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांकडे मागे वळून पाहिलं, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते…त्यांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाचा नायक कुठल्या ना कुठल्या अर्थाने “घरी” परतण्याचा प्रयत्न करत असतो.

‘मेमेंटो’मध्ये स्मृतींच्या भूलभुलैय्यात अडकलेला माणूस…

‘इन्सेप्शन’मध्ये वास्तव आणि स्वप्न यांच्या सीमारेषा ओलांडत आपल्या मुलांकडे परतण्याची धडपड करणारा कॉब…

‘इंटरस्टेलर’मध्ये विश्वाच्या अंतहीन विस्तारातून मुलीकडे परतण्याची आस असलेला कूपर…

‘डंकर्क’मध्ये युद्धातून सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचण्याचा संघर्ष…

आणि ‘ओपेनहायमर’मध्ये स्वतःच्या निर्णयांच्या ओझ्याखाली दबलेला वैज्ञानिक…

हे सारे प्रवास एका अदृश्य धाग्याने जोडलेले आहेत.

तो धागा म्हणजे ‘द ओडिसी’.

जणू नोलन गेली तीन दशके या एका कथेकडेच परतत होते.

मॅट डेमनचा ओडिसियस…नायक की अपराधी?
मॅट डेमनने साकारलेला ओडिसियस पारंपरिक अर्थाने नायक नाही.

तो बुद्धिमान आहे.

धूर्त आहे.

रणनीतीकार आहे.

पण तो निर्दोष नाही.

त्याच्या प्रत्येक निर्णयाची किंमत इतरांना मोजावी लागते.

त्याचा विजयही रक्ताने माखलेला आहे… रक्तरंजित !!!

मॅट डेमन या भूमिकेत अफाट संयम दाखवतो. संवादांपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर उमटणारी अपराधी भावना, थकवा, हरवलेपण आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द अधिक बोलकी ठरते.

हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात परिपक्व अभिनयांपैकी एक म्हणून या कलाकृतीचा उल्लेख करावा लागेल…

टॉम हॉलंडचा भावनिक प्रवास
टेलीमॅकसच्या भूमिकेत टॉम हॉलंड आश्चर्यचकित करतो.

सुपरहिरो प्रतिमेच्या बाहेर येत तो एका अशा मुलाची भूमिका साकारतो, ज्याने वडिलांना जवळपास कधीच पाहिलेलं नाही.

तो वडिलांचा शोध घेतो, पण त्याच वेळी स्वतःचीही ओळख शोधत असतो.

ही व्यक्तिरेखा चित्रपटाला आवश्यक असलेली भावनिक खोली देते.

अॅन हॅथवे यांनी साकारलेली पेनेलोप ही The Odyssey मधील सर्वात संयमी आणि अंतर्मुख व्यक्तिरेखांपैकी एक आहे. तिच्या वाट्याला मोठे अॅक्शन सीक्वेन्स किंवा भावनांचा उद्रेक करणारे संवाद येत नाहीत. उलट, तिच्या अभिनयाची खरी ताकद संयम, नजरेतील भावना आणि अंतर्गत वेदना यातून प्रकट होते.

होमरच्या महाकाव्यात पेनेलोप ही केवळ नायकाची पत्नी नसून निष्ठा, बुद्धिमत्ता, संयम आणि राजकीय चातुर्य यांचं प्रतीक मानली जाते. ती वीस वर्षे ओडिसियसची वाट पाहते, पण फक्त वाट पाहत बसत नाही. इथाकाच्या सिंहासनावर डोळा ठेवणाऱ्या वरपक्षांना ती आपल्या बुद्धीने रोखून धरते. दिवसा विणकाम करणे आणि रात्री ते उधळून पुन्हा सुरू करणे हा तिचा प्रसिद्ध डाव तिच्या बुद्धिमत्तेचं उदाहरण आहे.

नोलनच्या चित्रपटात अॅन हॅथवे या व्यक्तिरेखेतील आत्मविश्वास, राजमाता म्हणून असलेलं गांभीर्य आणि पत्नी म्हणून असलेली आतुरता अत्यंत सूक्ष्मपणे व्यक्त करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील पोकळी आणि प्रत्येक संवादातील शांत लय यामुळे पेनेलोपच्या दीर्घ प्रतीक्षेचं ओझं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.

सामंथा मॉर्टनची सर्की…

चित्रपटात अनेक मोठे कलाकार आहेत, पण प्रेक्षकांच्या स्मरणात सर्वाधिक काळ राहते ती सामंथा मॉर्टनची सर्की.

तिच्या प्रत्येक दृश्यात भीती आहे…

गूढता आहे…

सौंदर्य आहे…

आणि मृत्यूची सावली आहे.

प्रॅक्टिकल इफेक्ट्सच्या साहाय्याने उभा केलेला हा भाग नोलनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक भयावह दृश्यांपैकी एक ठरतो.

तांत्रिक वैभव…जे पडद्यावर अनुभवावंच लागतं

चित्रपटाचं दृश्यवैभव हा त्याचा सर्वात मोठा नायक आहे.

भव्य समुद्र…

खडकाळ बेटे…

वादळी आकाश…

राक्षसी सायक्लॉप्स…

अधोलोकातील अंधार…

प्रत्येक फ्रेम एखाद्या प्राचीन चित्रासारखी भासते.

छायाचित्रकार होयटे व्हॅन होयटेमा यांनी भूमध्य समुद्राचं चित्रण इतक्या वास्तववादी पद्धतीने केलं आहे की प्रत्येक दृश्यातून खाऱ्या वाऱ्याचा स्पर्श जाणवतो.

तर लुडविग गोरान्सन यांचं संगीत या प्रवासाला आत्मा देतं.

कुठेही अनावश्यक गाजावाजा नाही.

भावना शांतपणे मनात उतरतात.

नोलनची मर्यादा अजूनही कायम…
चित्रपट जवळपास प्रत्येक पातळीवर प्रभावी असला तरी काही प्रश्न कायम राहतात.

पेनेलोपसारखी महत्त्वाची व्यक्तिरेखा अधिक सखोल लिहिली जाऊ शकली असती.

स्त्री व्यक्तिरेखांच्या भावविश्वाला नोलन अजूनही पुरुष पात्रांच्या तुलनेत कमी जागा देतात, ही टीका येथेही लागू पडते.

हा चित्रपट फक्त राक्षसांविषयी नाही.

तो युद्धानंतर उरलेल्या जखमांविषयी आहे.

तो माणसाच्या अहंकाराविषयी आहे.

तो घर म्हणजे नेमकं काय, या प्रश्नाविषयी आहे.

तो काळ बदलला तरी न बदलणाऱ्या मानवी भावनांविषयी आहे.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे…

तो स्वतःला हरवून पुन्हा स्वतःकडे परत येण्याच्या प्रवासाविषयी आहे.

काही ठिकाणी चित्रपटाचा वेग जाणूनबुजून मंदावतो.

मात्र त्या संथ लयीमुळेच कथेला महाकाव्याची उंची प्राप्त होते.

काही चित्रपट संपतात…

काही चित्रपट आठवणीत राहतात…

आणि काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून जातात…

‘द ओडिसी’ हा या प्रकारातील चित्रपट आहे…

हा चित्रपट प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करत नाही, तर त्यांना विचार करायला भाग पाडतो.

ज्यांना मोठ्या पडद्यावर जगणं पाहायचं अनुभवायचं आहे, त्यांच्यासाठी ‘द ओडिसी’ हा यंदाच्या वर्षातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट ठरतो.

द ओडिसी’ का पाहावा?
एकाचवेळी दृश्यवैभव तितक्याच ताकदीची कथा, उत्कृष्ट अभिनय, तांत्रिक परिपूर्णता, कालातीत असणाऱ्या भावना आणि आत्मशोधाचा प्रवास
का टाळावा – नोलनचे सिनेमे आवडत नसतील तरच… किंवा ऐतिहासिक सिनेमे आवडत नसतील तरच…

थोडक्यात काय -ख्रिस्तोफर नोलनचे सिनेमॅटिक महाकाव्य

⭐⭐⭐⭐1/2⭐ (4.5/5)

follow us