बेस्ट अॅनिमेटेड फिचरमध्ये ‘फ्लो’ चा डंका अन् चित्रपट समीक्षक गणेश मतकरींची पोस्ट व्हायरल

Oscars 2025 : 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये लाटवियन ॲनिमेशन चित्रपट ‘फ्लो’ (Flow) ने बेस्ट अॅनिमेटेड फिचरसाठी ऑस्कर (Best Animated Feature) जिंकला आहे. या चित्रपटाने इनसाइड आउट 2 (Inside Out 2) आणि द वाइल्ड रोबोट (The Wild Robot) सारख्या चित्रपटांना मागे टाकत बेस्ट अॅनिमेटेड फिचरसाठी ऑस्कर जिंकला आहे.
गिंट्स झिलबालोडिस (Gints Zilbalodis) यांनी या चित्रपटाला दिग्दर्शित केला आहे. फ्लो हा ओपन-सोर्स ॲनिमेशन सॉफ्टवेअर ब्लेंडर वापरून तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला जानेवारीमध्ये बेस्ट ॲनिमेशनसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार देण्यात आला होता. तसेच फ्लो चित्रपट लाटवियन थिएटरमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. याचबरोबर या चित्रपटाचा प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. बेस्ट इंटरनेशनल फिचरसाठी ‘फ्लो’ ला ऑस्कर जाहीर होताच सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक आणि लेखक गणेश मतकरी (Ganesh Matkari) यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये ‘फ्लो’ ला ऑस्कर मिळणं हे सरप्राईज होतं. या कॅटेगरीमध्ये ‘द वाईल्ड रोबॉट ‘ याला पुरस्कार मिळेल असं सर्वांचे मत होतं असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
चित्रपट समीक्षक आणि लेखक गणेश मतकरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘फ्लो’ ला ऑस्कर मिळणं हे सरप्राईज होतं. लोकप्रिय मत असं होतं, की हा पुरस्कार ‘द वाईल्ड रोबॉट ‘ घेऊन जाईल. आणि तेही अगदीच चूक ठरलं असतं असं नाही दोन्ही फिल्म्स सेन्सिबल, मन लावून केलेल्या आहेत, पण ‘फ्लो’ अनेक कारणांनी वेगळी आहे. त्यांच्या विकिपिडिआ पेजवर गेलात तर तुम्हाला ती किती वेळ लावून केली आहे ( साडेपाच वर्ष) कोणतं फ्री सॅाफ्टवेअर वापरलय ( ब्लेन्डर ) वगैरे तपशील कळतील, तसंच गोल्डन ग्लोब मिळवणारी ही पहिली लॅटविअन फिल्म आहे, किंवा ॲनिमेटेड फीचरचं ऑस्कर मिळवणारी पहिली इन्डीपेन्डन्टली प्रोड्यूस्ड फिल्म आहे हे देखील कळेल. पण वेगळेपणा तेवढ्यापुरता नाही. पहिली गोष्ट म्हणजे ती ॲनिमेटेड फीचर असूनही टिपीकल मुलांची फिल्म नाही.
तशी फिल्म कॅनमधे Un Certain Regard विभागात स्पर्धा करणंही कठीणच आहे, जी फ्लो ने केली आणि तिथून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीला सुरुवात झाली. अमेरिका जसे फॅार्म्युले तयार करते तसाच मुलांच्या फिल्म कशा असाव्यात याचाही एक ढोबळ फॅार्म्युला त्यांनी केला आहे. त्यांनी म्हणजे प्रामुख्याने डिस्नीने, आणि पुढे पिक्सार, ड्रीमवर्क्स सारख्या स्टुडीओजनी त्याला डोळ्यासमोर ठेवूनच फिल्म बनवायला सुरुवात केलीय. प्राण्यांच्या व्यक्तीरेखांचं डिस्नीफिकेशन हा यातला मोठा भाग. मानवेतर व्यक्तीरेखांनीही माणसांसारखच वागायबोलायचं, विनोद करायचे, साहसात सहभागी व्हायचं, ही प्रथा. आता हे करताना पटकथा फार काळजीपूर्वक रंगवली जाते, मुलांच्या मनोरंजनाचा विचार दर प्रसंग रचताना केला जातो, आणि तरीही हे चित्रपट बाळबोध होणार नाहीतसं पाहिलं जातं. गिन्ट्स झिलबलॅाडिस दिग्दर्शित ‘फ्लो’मधेही प्राण्यांचं साहस ही परिचित वाटावी अशी गोष्ट आहे पण त्यांनी निवडलेली दिशा भिन्न आहे.
‘फ्लो’ मधले प्राणी हे खऱ्या प्राण्यांसारखे आहेत. ते तसेच दिसतात, वागतात, ते माणसांची भाषा वापरत नाहीत, त्यांच्यासारखे चालतबोलत नाहीत. वेगवेगळ्या प्रजातीच्या प्राण्यांमधे त्यांच्या मूळच्या स्वभाववैशिष्ट्यांसह जितपत संवाद होणं शक्य आहे तितपतच तो इथेही होतो. चित्रपट पोस्टह्यूमन काळात घडतो इतपत आपल्याला कळतं. मानवजात अलीकडेच गायब झाली असावी हे लक्षात येणाऱ्या खुणा दिसतात पण ती नक्की कुठे गेली याचं स्पष्टीकरण दिलं जात नाही, त्यातून काही निसर्गाबद्दलचे संदेश दिले जात नाहीत. कथाभाग म्हणायचा तर एवढाच, की एका पाळीव ( कोणे एके काळी पाळीव असलेल्या ) मांजराच्या रहात्या भागातली पाण्याची पातळी अचानक झपाट्याने वाढायला लागते, आणि जिवंत रहाण्यासाठी चाललेल्या त्याच्या धडपडीत इतरही काही प्राण्यांची पक्ष्याची साथ त्याला मिळते, सगळे मिळून यात तग धरुन राहण्याचा प्रयत्न करतात.
फिल्म वास्तव आणि सररिअल यांची सरमिसळ करते, आणि अनेक गोष्टी आपल्या इन्टरप्रिटेशनसाठी शिल्लक ठेवते. त्यातला संदेश म्हणायचा तर तो एकमेकांना साह्य करण्याचा आहे, फिल्ममधे मानव नसतानाही मानवतेचा आहे, बांधल्या जाणाऱ्या नात्यांचा आहे. पण तो वरवरचा नाही. ‘आईस एज’ मालिकेतल्या फिल्म्सशी ‘फ्लो’ची तुलना करुन पाहिली तर मी काय म्हणतोय हे लक्षात येईल.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मी स्वीकारला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
फिल्म दिसायला सुंदर आहेच, आणि अनेक अनपेक्षित प्रसंगांमधून, दृश्यरचनांमधून आपल्याला घेऊन जाणारी आहे. मी फिल्म टिपीकल मुलांची नाही असं म्हणालो तरी त्याचा अर्थ ती मुलांनी पाहू नये असा अजिबात नाही. त्यात त्यांनी न पहाण्यासारखं काहीच नाही. फक्त ती त्यांना जेवढी आवडेल त्याहून कदाचित थोडी अधिक त्यांच्याबरोबर गेलेल्या पालकाला आवडू शकते. अर्थात, त्यांनी ती जागरुकपणे पहावी ही अपेक्षा आहेच. आत्ता ही फिल्म आपल्याकडे लागलेली आहे. कदाचित कालच ऑस्कर मिळाल्याने शोज वाढतीलही. जरुर पहा. घरातल्या मुलांना दाखवा. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.